मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अरुणोदयाच्या वेळेस श्रीगुरुदत्तात्रेयांचा जन्म झाला. हा दिवस देशभरात ‘दत्तजयंती उत्सव’ म्हणून साजरा केला जातो. सदगुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार दरवर्षी न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे (श्रीहरिगुरुग्राम) येथे ‘दत्तजयंती उत्सव’ आयोजित केला जातो.
‘दत्तगुरु हा माझा नित्य जप आहे. हे माझे अखंड नामस्मरण आहे आणि हेच माझे सर्वस्व आहे’, असे सदगुरु श्री अनिरुद्धांनी ’श्रीमद्पुरुषार्थ’ ग्रंथराजाच्या ‘प्रेमप्रवास’ या द्वितीय खंडात सांगितले आहे. तसेच सदगुरु श्री अनिरुद्ध लिखित ‘मातृवात्सल्यविन्दानम्’ या ग्रंथात एकतीसाव्या अध्यायात श्री गुरुदत्तात्रेयांचा महिमा पुढीलप्रमाणे आलेला आहे.
आदिमाता चण्डिका उवाच, ‘‘ हे दत्तात्रेय ! तू श्रद्धाहीनांचा नाश करणारा होऊन ह्या परमात्म्यास सदैव सहाय्यभूत हो. कारण माझ्या प्रथम स्पंदाच्या वेळेस ॐकाररूपाने प्रकटलेल्या ह्या प्रणवरूप परमात्म्याच्या आधीच स्पंद सुरू होताच प्रकटलेला शुभ्र आणि शुद्ध दिव्य प्रकाश व म्हणूनच ह्या ॐकाराचा संरक्षक तूच आहेस.’’
’मातृवात्सल्यविन्दानम्’ ग्रंथातून सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘कलियुगातील मानवास तारक ठरणारी गुरुभक्ती अर्थात श्रीदत्तात्रेयभक्ती हेच श्रीदत्तमंगलचण्डिकेचे हृदय आहे’, असेही म्हटले आहे. त्यामुळे दत्तजयंती हा श्रीगुरुभक्तीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. प्रत्येक श्रद्धावानाला हा दिवस आनंद आणि समाधान देतो.
दरवर्षी श्रीहरिगुरुग्राम येथे साजर्या होणार्या दत्तजयंती उत्सवाचे स्वरूप –
सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार साजर्या होणार्या या दत्तजयंती उत्सवात श्रद्वावान स्तोत्रपठण, मंत्र आणि गजर याचा आनंद लुटतात.
दत्तगुरुंना आवाहन करणार्या खालील प्रार्थनामंत्राचे ५४ वेळा पठण होते.
भोः दत्तगुरु । कृपया समागच्छ ।
सर्वरूपाणि दर्शय । मम ह्रदये प्रविश्य ।
मम सहस्त्रारे प्रतिष्ठ । ॐ नमो नमः ॥
दत्तजन्म ह्रुदयात व्हावा आणि सहस्त्रारचक्रात त्याची प्राणप्रतिष्ठा व्हावी हा शुद्ध हेतू मनात ठेवून श्रद्धावान हा प्रार्थनामंत्र प्रेमपूर्वक म्हणतात.
यानंतर श्रीवासुदेवानंदसरस्वतीकृत घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण होते.
घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे पठण झाल्यावर रंगावधूत महाराजांनी रचलेल्या ‘दत्तबावनी’ या स्तोत्राचे पठण होते. नंतर श्रद्वावान ‘ॐ साई श्री साई जय जय साईराम’च्या गजरात तल्लीन होतात.
दत्तजयंती विशेष –
– दत्तजयंतीच्या पवित्र दिवशी श्रीवर्धमान व्रताधिराजाची सुरुवात होते. मार्गशीर्ष पौर्णिमा ते पौष पौर्णिमा या महिनाभराच्या कालावधीत हे व्रत केले जाते. ‘‘श्रीवर्धमान व्रताधिराज म्हणजे मानवाच्या जन्मास येऊन मानवी जन्म व्यर्थ न जाण्याची ग्वाहीच आहे! श्रीवर्धमान व्रताधिराज म्हणजे परमात्म्याच्या नऊ अंकुरऐश्वर्याची प्राप्ती करून घेण्याचा महामार्ग, श्रीदत्तजयंतीच्या पवित्र दिनी सुरु होणारे हे व्रत आधुनिक नववर्षाच्या प्रथम दिवसास (म्हणजेच १ जानेवारी) स्वतःच्या उदरात सामावून घेते व आपोआपच नवीन वर्षासाठी शुभ स्पंदनांचा लाभ होतो आणि भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होतात’’, असे सदगुरु श्री अनिरुद्धांनी ’श्रीमद्पुरुषार्थ’ ग्रंथराजाच्या ‘आनंदसाधना’ या तृतीय खंडात सांगितले आहे.
– दत्तजयंतीचा मुहूर्त साधून २००५ साली सदगुरु श्री अनिरुद्धांनी (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी) ‘प्रत्यक्ष’ हे बिगर राजकीय दैनिक सुरू केले. सदर दैनिकातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींबरोबरच तिसर्या महायुद्धाच्या संबंधीत बातम्यांचा वेध घेतला जातो.
– १९९६ ते २००४ सालापर्यंत दत्तजयंतीच्या दिवशी सदगुरु श्री अनिरुद्ध विशेषांकाचे प्रकाशन होत असे.