श्रीधनलक्ष्मी व श्रीयंत्रपूजन

भारतीय संस्कृतीनुसार, अश्विन वद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी. ह्या दिवशी घरातील ऊर्जास्थानांचे अर्थात धन, अलंकार व दीपांचे यथासांग पूजन केले जाते. त्यामागे मूळ प्रार्थना अशी असते की, ‘हे लक्ष्मीमाते, तू दिलेल्या संपत्तीचा आम्ही मान राखू व त्याचा विनियोग तुला आवडणार्‍या सत्कार्यांसाठी करू. ही संपत्ती अशीच पवित्र मार्गाने वृद्धिंगत होत राहू दे.’

अशा या धनत्रयोदशीच्या दिवशी आदिमाता महालक्ष्मी आणि भक्तमाता श्रीलक्ष्मी या दोघींची कृपा प्राप्त करून घेता येते. या दोन्ही मातांचे अधिष्ठान म्हणजे ‘श्रीयंत्र’. श्रीयंत्राच्या केवळ पूजनाने आणि दर्शनाने आदिमाता महालक्ष्मी आणि भक्तमाता श्रीलक्ष्मी यांची सहज कृपा प्राप्त करून घेता येते.

या श्रीयंत्राबाबत सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सांगितले आहे कि, ‘श्रीयंत्र हा एक किल्ला आहे, गड आहे, ज्या गडावर ही आदिमाता राहते. ह्या श्रीयंत्राच्या केवळ भावपूर्ण दर्शनाने मनुष्याच्या शरीरातील केंद्रांना बळ मिळते.’

’श्री’ म्हणजे श्रेष्ठता, ’श्री’ म्हणजे पूजनीय आणि ’श्री’ म्हणजे षोडश एैश्‍वर्यप्राप्तीचे साधन.

ह्या विश्‍वाचे संपूर्ण शक्तिसामर्थ्य आणि ऐश्‍वर्य ‘श्री’च्या अधीन आहे. म्हणून मानवाला महात्रिपुरसुंदरी आदिमाता चण्डिकेचे प्रेम, तिचे षोडश एैश्‍वर्य आणि शक्तिसामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी श्रीयंत्राची उपासना व पूजन हा अत्यंत फलदायी मार्ग आहे.

सर्व प्रकारचे प्रापंचिक व पारमार्थिक ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी सद्गुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार श्रद्धावान धनत्रयोदशीला श्रीहरिगुरुग्राम येथे धनलक्ष्मी आणि श्रीयंत्र पूजन उत्सव श्रद्धेने साजरा करतात.

श्रीयंत्राबाबत माहिती –

सदगुरु श्रीअनिरुद्ध लिखित ‘मातृवात्सल्यविंदानम्’ ह्या ग्रंथामध्ये वर्णन केल्याप्रमाणे आदिमातेच्या आदेशानुसार व श्रीगुरुदत्तात्रेयांच्या सांगण्यानुसार लोपामुद्रेने श्रीसूक्ताचे नित्यपठण केले. श्रीयंत्राचे रचनाकार्य परिपूर्ण करण्यासाठी श्रीगुरुदत्तात्रेयांनी सांगितलेल्या ‘श्रीयंत्राच्या अधिष्ठान मंत्राचा’ अखंड जप तिने केला व त्यानंतर श्रीयंत्राची रचना केली. हा श्रीयंत्राचा अधिष्ठान मंत्र पुढीलप्रमाणे –

ॐ श्री कमले कमलालये प्रसीद प्रसीद, श्रीं र्‍हीं ॐ महालक्ष्म्यै नमो नम:|

श्रीयंत्राची रचना व उत्सवदिनी स्थापना –

श्रीयंत्र व त्याची रचना आणि पूजन यांचे महत्त्व सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी मातृवात्सल्यविंदानम्‌ तसेच दैनिक ‘प्रत्यक्ष’ मधील ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेख मालिकेत व्यवस्थितपणे स्पष्ट केले आहे.

उत्सवदिनी म्हणजे धनलक्ष्मी पूजनाच्या दिवशी सदगुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार षोडश (१६ प्रकारच्या) उपासनांनी व जपांनी सिद्ध केलेल्या द्विमितीय (Top View) (……..फोटो) व त्रिमितीय (Three Dimentional) (……..फोटो) अशा दोन्ही प्रकारच्या श्रीयंत्राची स्थापना आणि पूजन उत्सवस्थळी स्टेजवर केली जाते. सर्वांना ह्याच्या दर्शनाचा लाभ घेता येतो.

विनम्रपणे आदिमातेचे व सदगुरु त्रिविक्रमाचे स्मरण करून श्रीयंत्रास नित्यनियमितपणे वंदन करणार्‍या श्रद्धावानांच्या दुष्प्रारब्धावर, षड्रिपूंवर, कुवृत्तींवर ह्या देवतांच्या हातातील शस्त्रे व अस्त्रे उगारली जातात. प्रारब्धामुळे श्रद्धावानांच्या जीवनात येणार्‍या अडचणी व संकटे दूर होण्यास व त्यांचा सर्व प्रकारे उत्कर्ष होण्यास ह्या सक्रियतेमुळे सहाय्य मिळते.

उत्सवातील भक्तिमय कार्यक्रम पुढीलप्रमाणे

१) श्रीयंत्र पूजन

२) श्रीधनलक्ष्मी पूजन

३) दत्तमालामंत्र पठण

४) श्रद्धावानांतर्फे श्रीयंत्राचे पूजन व अर्चन

एखाद्या श्रद्धावानाकडे श्रीयंत्र नसेल तरीही स्टेजवरील श्रीयंत्राच्या पूजनाचे दर्शन घेतल्यानेसुद्धा शांती, तृप्ती, समाधान व भक्तीचे पुण्य सहजपणे प्राप्त होते. श्रद्धावान नवीन श्रीयंत्र प्रतिमा किंवा घरची श्रीयंत्र प्रतिमा उत्सवस्थळी बरोबर आणतात व तेथे त्या श्रीयंत्राचे पूजन व अभिषेक करू शकतात.

उत्सवस्थळी सदगुरु श्रीअनिरुद्धांनी सिद्ध केलेले श्रीयंत्र इच्छुक श्रद्धावानांना पूजनानंतर घरी देवघरात किंवा द्रव्यपेटीत ठेवता येते.

घरातील श्रीयंत्राच्या केवळ अस्तित्वाने आपल्याला लाभ होऊ शकतो.

नित्यपूजनात अनवधानाने काही चूक झाली तरीही पूजकाला हानी न होता ते सदैव लाभदायीच ठरते. म्हणजेच श्रीयंत्राचे केवळ अस्तित्वच शुभ, ऐश्वर्यदायक, सामर्थ्यप्रद व फलप्राप्तिदायक मानले जाते. श्रद्धेने श्रीयंत्राचे दर्शन घेणार्‍यास शुभस्पंदने व त्याच्यासाठी उचित असणारे सर्व काही प्राप्त होते.

श्रीयंत्रपूजन व श्रीधनलक्ष्मी पूजन झाल्यानंतर श्रद्धावान दत्तमाला मंत्राचे अखंड पठण करतात तेव्हा पवित्र यज्ञास प्रारंभ होतो.

श्रद्धावान ह्या यज्ञात स्वेच्छेने समिधा अर्पण करतात.

श्रीगुरुदत्तात्रेयांचा आशिर्वाद लाभून श्रीकृपा प्राप्त व्हावी म्हणून हा यज्ञ व दत्तमालामंत्रपठण केले जाते, ह्या यज्ञस्थानी अत्यंत पवित्र आनंददायी व भारलेल्या वातावरणाची अनुभूती श्रद्धावानास मिळते.

रात्री पूर्णाहुतीनंतर महाआरती, सत्संग व गजराच्या जयघोषात उत्सवाची सांगता होते.

दिवाळी फराळ स्वीकृती व वाटप – ज्या श्रद्धावानांना फराळ द्यायची इच्छा असते ते श्रद्धावान उत्सवस्थळी फराळ घेऊन येतात व जमा झालेल्या ह्या फराळाचे गरीब व गरजू वस्त्या, अनाथ वृध्द, अपंग यांना मदत करणार्या सामाजिक संस्था अशा विविध ठिकाणी वाटप केले जाते.

अशाप्रकारे श्रीधनलक्ष्मी व श्रीयंत्रपूजन उत्सव दरवर्षी धनत्रयोदशीला सकाळी ९ ते रात्रौ १० या वेळेत अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात उत्साहाने साजरा केला जातो.