श्रीरामनवमी उत्सव

भगवान श्रीरामांच्या कथा आणि त्यांचे नाम हा संपूर्ण भारतवर्षाचा आत्मा आहे. त्रेतायुगातील श्रीरामजन्माच्या कथेपासून लंकेत रावणवधापर्यंतच्या रामकथांमधील प्रत्येक भागाचे भारताच्या कानाकोपर्‍यात श्रवण व गुणसंकीर्तन केले जाते. मर्यादा-पुरुषार्थ! मूर्तीमंत संयम! मानवासाठी अत्युत्तम आदर्श! असलेले श्रीराम हे कोट्यवधी भारतीयांचे दैवत आहेत आणि त्यांच्या कथा जणू मार्गदर्शक संजीवनीच आहेत.

‘श्रीरामावताराचे’ वर्णन असलेला ‘रामायण’ हा वैदिक धर्मग्रंथ फक्त भारतातच नव्हे तर दक्षिण व आग्नेय आशिया खंडातील संस्कृतीतही महत्त्वपूर्ण ठरला आहे. भारतीय उपखंडात श्रीलंका, म्यानमार या देशासंह उपखंडाच्या पलीकडेही इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया, मलेशिया, लाओस, फिलिपाईन्समध्येही रामकथा ऐकल्या जातात, त्यावर नाट्य व नृत्य आधारलेली असतात. इटलीतील अनेक प्राचीन वास्तूंमध्ये भगवान राम, लक्ष्मण, सीतेची चित्रे रेखाटलेली आहेत.

रामनामाने नाश होत नाही असे कोणतेही पाप नाही आणि रामनामाने ज्याचा उद्धार झाला नाही असा कोणताही पापी नाही, या शब्दांत सद्गुरु श्रीअनिरुद्ध (बापू) रामनामाची महती सांगतात. बापूंनी लिहलेल्या ‘रामरसायन’ या ग्रंथाद्वारे भगवान रामाचे चरित्र श्रद्धावानाच्या डोळ्यासमोर उभे राहते आणि रामायणाचे व रामनामाचे महत्त्वही समजते. ’रामरसायन’ हा ग्रंथ लिहून सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांना राम चरित्राचे महत्त्वही समजावले आहे. परमात्म्याचे मानवी रूप असलेल्या रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला. हा चैत्र शुभंकरा नवरात्रीतील नववा दिवस ‘श्रीरामनवमी’ म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो.

ज्या पवित्र भूमीवर भगवान राम जन्माला आले त्या भारतात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट, श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन आणि संलग्न संस्थांतर्फेही हा उत्सव भक्तिमय वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो. यामध्ये लाखो श्रद्धावान सहभागी होत असतात.

श्रीरामनवमी उत्सवाची सुरुवात साईनिवास मधून सकाळी ८ वाजता उत्सवस्थळी आणण्यात आलेल्या ‘दीपशिखे’च्या आगमनाने होते.

दीपशिखेद्वारे ‘श्रीसाईराम-सहस्र-यज्ञा’च्या अग्नीचे प्रज्वलन केले जाते. ‘आपत्तिनिवारक समिधा’ ह्या यज्ञामध्ये श्रद्धावानांना अर्पण करता येतात. त्यावेळेस तारकमंत्राचे पठण चालू असते. ह्या हवनामुळे प्रत्येक श्रद्धावानाच्या मनाला व प्राणांना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, तसेच पूर्वजन्मातील पापांचे भंजन होते असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.

श्रीरामवरदायिनी आदिमाता महिषासुरमर्दिनीचे पूजन रामनवमी उत्सवामध्ये केले जाते. ‘रामवरदायिनी दुर्गा’ हे नामाभिधान आदिमाता महिषासुरमर्दिनीला कसे प्राप्त झाले, याची कथा रामायणात येते. सद्गुरू अनिरुद्धांनी लिहिलेल्या ‘मातृवात्सल्यविंदानम्’  या ग्रंथातही यासंदर्भात विस्तृत वर्णन येते. श्रीराम-रावण युद्ध अधिकाधिक अक्राळविक्राळ होऊ लागले, प्रलयाग्निप्रमाणे भासू लागले तेव्हा श्रीहनुमंतांच्या सूचनेप्रमाणे प्रभु श्रीरामचंद्रांनी आदिमातेच्या ‘अशुभनाशिनी स्तवन’ या स्तोत्राचे पठण सुरू केले. मध्यरात्रीच्या समयास रणांगणावर ती अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी प्रकटली व तिने ‘श्रीरामास विजय प्राप्त होईल’ हा आशीर्वाद दिला. अर्थातच रावणाचा वध करून श्रीराम विजयी झाले; तेव्हा ती आदिमाता त्रिपुराम्बा महिषासुरमर्दिनी स्वरुपात प्रकटली व ‘रामो राजमणि: सदा विजयते’ असा वर देऊन ती अंतर्धान पावली. ह्या वरामुळे ‘रामनाम’ तारकमंत्र बनले व महिषासुरमर्दिनीच्या ह्या अवतारास ‘रामवरदायिनी दुर्गा’ हे नामाभिधान प्राप्त झाले.

या उत्सवात ‘रेणुकामाता पूजन’ही केले जाते. तांदळ्याच्या (रेणुकामातेचे मुख) रूपातील रेणुकामातेचे आगमन होताच मातेचा जयजयकार केला जातो. रेणुकामातेचे औक्षण करून मंगलवाद्यांच्या गजरात उत्साहाने स्वागत केले जाते. तिचे षोडशोपचारे पूजन करून सहस्रधारा अभिषेक केला जातो. अभिषेकाचे पात्र गोमातेच्या आचळांच्या रचनेप्रमाणे असल्यामुळे अभिषेक ‘अनेक’ धारांनी बरसतो व म्हणूनच त्याला ‘सहस्रधारा अभिषेक’ असे म्हटले जाते.

त्यानंतर रेणुकामातेची आरती करण्यात येते. ‘माता रेणुकेच वात्सल्य जसे त्या भगवान श्रीपरशुरामाला मिळालं तसं आम्हा सर्वांना तिचं वात्सल्य लाभू दे.’, हीच प्रार्थना तिच्या चरणी प्रत्येकजण करतो.

श्रीरामनवमीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘रामजन्म सोहळा’. परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार दुपारी श्रीरामजन्म पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या बालपणी ज्या झोळीचा वापर केला गेला, त्याच झोळीचा श्रीरामजन्माच्यावेळी पाळणा म्हणून उपयोग केला जातो. ‘कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’ च्या गजरात आणि रामाच्या पाळण्याचे गीत गाण्यात सर्व श्रद्धावान सहभागी होतात. त्यानंतर रामरायाचे ‘श्रीराम’ म्हणून नामकरण केले जाते आणि ‘सुंठवडा’ प्रसाद म्हणून वाटला जातो. हा पाळणा व त्यातील प्रतीक स्वरूपातील श्रीराम यांचे श्रद्धावानांना दर्शन घेता येते.

उत्सवात ‘श्रीसाई सत्पूजन’ केले जाते. साईसच्चरितकार हेमाडपंत यांना शिरडीनिवासी साईनाथांनी १. रुद्राक्षमाला, २. त्रिशूल आणि ३. शाळिग्राम या तीन वस्तू दिल्या होत्या. या तीनही वस्तू साईनिवास येथून उत्सवस्थळी आणून त्याचे भक्तिभावाने पूजन केले जाते. पूजनानंतर तेथे अखंड ‘श्रीघोरकष्टोद्धरण स्तोत्रा’चे पठण केले जाते.

तसेच श्रीसाईसदाशिव मूर्तीवर ‘श्रीसाईनाथ महिम्नाभिषेक’ केला जातो. प्रत्येक भक्त ह्यावेळी प्रतीकात्मक पूजाभिषेक करू शकतो. हा अभिषेक कुटुंबातील सर्व व्यक्तिंच्या आरोग्यासाठी लाभदायक आणि मुख्यत: घरातील लहान मुलांसाठी उपयुक्त ठरतो, असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.

मंगलवाद्यांच्या गजरात ‘रक्ष रक्ष साईनाथ, श्री साईराम’ जप करता करता जेव्हा कोणताही श्रद्धावान ‘तळीभरण’ करतो, तेव्हा त्या श्रद्धावानाला अन्नदानाचे पुण्य व आशीर्वाद मिळतात, म्हणून श्रद्धावान ह्या ‘तळीभरण’ विधीत आनंदाने सहभागी होतात.

उत्सवस्थळी ‘ॐ रामाय रामभद्राय रामचंद्राय नम:|’ हा जप दिवसभर अखंडपणे चालू असतो. जे श्रद्धावान पठणाला असतात, ते एकमेकांच्या कपाळावर बुक्का लावतात व नमस्कार करतात. ज्याला बुक्का लावतात तो भक्तश्रेष्ठ पुंडलीक स्वरूप समजला जातो व जो बुक्का लावतो त्याचे हात जणू काही भक्तश्रेष्ठ पुंडलिकाचे हात असतात अशी भक्तांची श्रद्धा आहे व त्यानुसार भक्तिभावाने ते पठण करतात.

रामनवमी उत्सवस्थळी एका कक्षामध्ये साईसच्चरितातील एका अध्यायाचे सामूहिक अखंड पठण सुरू असते, ह्या कक्षाला ‘श्रीसाईसच्चरित अध्ययन कक्ष’ किंवा ‘आद्यपिपा कक्ष’ असेही म्हणतात. ‘आद्यपिपादादा’ म्हणजे ‘श्री. सुरेशचंद्र पांडुरंग वैद्य (दत्तोपाध्ये)’ हे साईनाथांचे निस्सीम भक्त आणि सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे श्रेष्ठ श्रद्धावान होते. श्रीसाईसच्चरितात सांगितल्याप्रमाणे दर वर्षी ‘रामनवमी’, ‘गुरुपौर्णिमा’, ‘कृष्णाष्टमी’ आणि ‘दसरा’ ह्या चार पवित्र दिवशी त्यांच्या श्रीसाईसच्चरिताच्या सप्ताहाची सांगता होत असे, असा त्यांचा ६० वर्षांचा रिवाज होता. खरोखरच श्रीसाईसच्चरिताच्या ११व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे ‘अखंड राम लाधाल’ ही पंक्ती त्यांच्या आयुष्यात सत्यात उतरली होती. प्रत्येक श्रद्धावान, जो ह्या कक्षामध्ये प्रवेश करतो, तो आद्यपिपांसारखा पूर्ण श्रद्धावान बनण्याचा निश्चय करून श्रीसाईसच्चरिताच्या अध्यायाचे पठण करतो.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या पंचगुरुंबाबत विवेचन करताना स्पष्ट केले की ‘श्रीराम’ हा त्यांचा कर्तागुरु आहे, तोच त्यांच्या नियोजित कार्याचा यशदाता आहे. 

श्रद्धावानांच्या मनातील रामभक्ती सदैव जागृत रहावी, तसेच उत्तरोत्तर वाढत जावी हीच सद्गुरु श्रीअनिरुद्धांची तळमळ आहे, त्यासाठी ‘रामजन्मोत्सव’ हे एक साधन आहेच, पण त्याबरोबरच त्यांनी इतरही अनेक महत्वपूर्ण गोष्टी श्रद्धावानांना दिल्या आहेत.

रामरक्षेवरील विविध प्रवचनातून या स्तोत्राचा अर्थ सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सांगितला व जीवनात त्याचे मर्म कसे उतरेल याचे मार्गदर्शन केले. श्रीरामांचे व हनुमंतांचे सुंदर श्लोकांद्वारे केलेले वर्णन सुंदरकांडामध्ये येते. सुंदरकांड पठणाचे फायदे अनेकवार श्रीअनिरुद्धांनी सांगितले आहेत. म्हणूनच संस्थेद्वारे सुंदरकांड पठण सप्ताह आयोजित करण्यात आला होता.

दैनिक ‘प्रत्यक्ष’ मध्ये सुंदरकांडातील ओव्यांचा संदर्भ देऊन सद्गुरु श्रीअनिरुद्ध ‘मानवी जीवन भक्तिमय कसे करावे’ हे सुबोध व रसपूर्ण अशा ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेखांमधून सांगत आहेत. ही अग्रलेख-मालिका गेली अनेक वर्षे चालू आहे.

कलिकाळावर मात करण्यासाठी व प्रारब्धाच्या तडाख्यातून बाहेर पडण्यासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘रामनाम वही’च्या रूपात श्रद्धावानांना जणू रामबाण उपायच दिला आहे. ही रामनाम वही त्यातील विविध जप लिहून झाल्यावर ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ मध्ये श्रद्धावान जमा करतात. ही बँकच आपले आयुष्य खर्‍या अर्थाने समृद्ध करते. श्रद्धावान जेव्हा ही रामनाम वही लिहितो तेव्हा त्याच्या जन्मोजन्मीच्या प्रवासातील अनेक सुंदर सेतू सहजतेने महाप्राण हनुमंत बांधून घेतात अशी श्रद्धावानांची भावना आहे. आता ही रामनाम वही ऍपस्वरुपातही गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे.

अशा प्रकारे सद्गुरु श्रीअनिरुद्ध श्रद्धावानांच्या मनातील रामभक्ती सदैव जागृत ठेवतात. रामनवमी उत्सवाच्या रात्री पूर्णाहुतीनंतर साईराम सहस्रयज्ञ संपन्न होतो व महाआरती होऊन रामनवमी उत्सवाची सांगता होते. श्रीरामनवमी उत्सवात सहभागी झालेला प्रत्येक श्रद्धावान पुढील ‘अनिरुद्ध महावाक्यम्’ आपल्या जीवनात उतरवण्याचा निर्धार करतच घरी परततो.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार ॥

मी सैनिक वानर साचार | रावण मरणार निश्चित ॥