सुंदरकांड

संतश्रेष्ठ श्री तुलसीदासांनी लिहिलेल्या रामायणाचे पठण संपूर्ण भारतभरात होते. कलियुगात रामनाम आणि रामभक्तीचा प्रसार तुलसीदासांनी लिहिलेल्या या रामायणातून सर्वदूर झाला. वाल्मिकी रामायण हे रामजन्माच्या कित्येक वर्ष अगोदरच रचले गेले आणि वाल्मिकी रामायणानंतर हजारो वर्षांनी तुलसी रामायणाची रचना झाली. ‘तुलसीदासांचा प्रत्येक श्‍वास रामनामाबरोबर निगडीत झालेला होता व ज्या क्षणाला त्यांच्या हृदयाचा प्रत्येक ठोका रामनामाशी निगडीत झाला, त्याच क्षणाला साक्षात महाप्राण श्रीहनुमंताने तुलसीदासांना दर्शन दिले व तुलसीदासांच्या दृष्टीसमोर प्रत्यक्ष संपूर्ण रामकथा हनुमंतप्रभुंनी जिवंत केली व अशी जिवंत कथा पाहतपाहताच तुलसीदासांनी ‘श्रीरामचरितमानस’ ही रामकथा लिहून पूर्ण केली.’, असे सद्गुरु श्रीअनिरुद्ध (बापू) यांनी तुलसीदासांच्या महानतेचा गुणगौरव करताना म्हटले आहे.

याच तुलसी रामायणातील ‘सुन्दरकाण्डा’चे पठण, पारायण संपूर्ण भारतात केले जाते. भारतात अनेक भाषा आहेत, मात्र हा भाषा फरक असून सुद्धा तुलसीदासांच्या या हिंदी रचनतेतील ‘सुन्दरकाण्डा’चे पठण भारतात सर्वत्र होताना दिसते. या सुन्दरकाण्डाचे पठण बापू सर्व श्रद्धावानांना आवर्जून करायला सांगतात. वेळोवेळी सुन्दरकाण्ड पठणाचे महत्त्व बापू प्रवचनातून सांगतात.

१७ मे ते २१ मे २०१६ दरम्यान ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’तर्फे सुन्दरकाण्ड पठण, पूजन आणि अभिषेक उत्सव करण्यात आला होता. सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेर्यंत संपूर्ण वैदिक पद्धतीने हे पूजन व अखंड पठण करण्यात आले. या उत्सव काळात प्रत्येक दिवशी १०८ वेळा ‘सुन्दरकाण्डा’चे पठण होत होते. प्रपाठकांबरोबर हजारो भक्त या पठणात दरदिवशी सहभागी होत होते. त्यामुळे या सामूहीक पठणातून असंख्य वेळा उत्सवस्थळी हे सुन्दरकाण्ड म्हटले जात होते. याच वर्षी जानेवारी महिन्यात ‘गुरुक्षेत्रम्’ येथेही अखंड सुन्दरकाण्ड पठणाचे आयोजन करण्यात आले होते. येथे बाराशे वेळा सुन्दरकाण्डाचे पठण झाले. बापूंच्या निवासस्थानामधील देवघरात असलेल्या रामपंचायतनच्या मुर्तींचे विधिवत पूजन व अर्चना करून हे पठण ‘गुरुक्षेत्रम्’मध्ये पार पडले.

‘‘रामायणातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट कोणती, तर ते ‘सुन्दरकाण्ड’. रामायणात प्रत्येक अध्यायाला त्यातील घटनेनुसार शिर्षक देण्यात आली आहेत. मात्र याला एक अध्याय अपवाद आहे, तो म्हणजे ‘सुन्दरकाण्ड. रामकथेचे अवकाश म्हणजे हे ‘सुन्दरकाण्ड’. म्हणूनच महर्षि वाल्मिकींनी या प्रकरणाचे नावच ‘सुन्दरकाण्ड’ असे ठेवले, असे बापू सांगतात.

या सुन्दरकाण्डात श्रीरामांच्या आज्ञेनुसार सीतामातेच्या शोधासाठी भारतवर्षाच्या दक्षिण टोकाला पोहोचलेल्या  हनुमंताने रावणाच्या लंकेकडे आकाशमार्गाने केलेले उड्डाण आणि  सीतामतेची भेट घेऊन तीला रामाचा संदेश दिल्यानंतर लंकादहन करून पुन्हा परतण्याची कथा आहे.

श्रीरामकथेचाच एक भाग असलेले सुन्दरकाण्ड म्हणजे रामायणातील अतिशय शुभ, सुंदर, तेजोमय आणि देदिप्यमान असे उत्तुंग शिखर. श्रीरामकथा सर्व विघ्नांचा, सर्व पापांचा, दु:खांचा आणि विकल्पांचा अंत करणारी तर आहेच, पण त्याच बरोबरीने विशुद्ध भक्तीचा उदय करणारीही आहे. श्रीरामकथा श्रद्धावानांच्या जीवनातून सर्व वाईट गोष्टींचे उच्चाटन करणारी असल्यामुळे संत तुलसीदास तिला मंगलभवन अमंगलहारी असे संबोधितात.

‘ह्या सुन्दरकाण्डात काय म्हणून नाही? मानवी जीवनास विकासासाठी, प्रपंचासाठी व परमार्थासाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन ह्या सुन्दरकाण्डात ठायीठायी भरलेले आहे. एवढेच नव्हे तर ह्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन संपूर्ण जन्म उत्कृष्ट करण्यासाठी, सुख, शांती व तृप्तीच्या प्राप्तीसाठी लागणारे सामर्थ्यसुद्धा देण्याची ताकद ह्या सुन्दरकाण्डात आहे.’, असे अनिरुद्धांनी ‘दै. प्रत्यक्ष’मध्ये ‘सुन्दरकाण्डा’वर लिहिलेल्या पहिल्या अग्रलेखात म्हटले होते.

२००७ सालच्या नारद जयंतीपासून (३ मे २००७) पासून बापू ’सुन्दरकाण्डा’वर अग्रलेख लिहीत आहेत. ‘तुलसीपत्र’ या शीर्षकाखाली बापू लिहीत असलेल्या या अग्रलेखांमध्ये तुलसीदासांच्या ‘सुन्दरकाण्डा’तील प्रत्येक ओवी आणि त्याचा अर्थ विशद करताना बापूंनी आतापर्यंत अनेक कथा उलगडल्या, विश्‍व इतिहासही बापूंनी याद्वारे मांडला. या ‘तुलसीपत्र’ अग्रलेख मालिकेचे आतापर्यंत १५०० हून अधिक अग्रलेख झाले आहेत.

बापूंनीच अनेक वेळा श्रद्धावानांना प्रवचनात सांगितल्यानुसार तुलसीरामायणातील सुन्दरकाण्डात  या विश्‍वातील सर्वश्रेष्ठ प्रार्थना व आशीर्वाद आहे. महाप्राण हनुमंत माता सीतेची भेट घेऊन तीला श्रीरामांचा निरोप देतात आणि अशोकवनात बसलेल्या सीतेचे शोकहरण  करतात. यावेळी सीतेने श्रीरामांची केलेली प्रार्थना आणि हनुमंताकरवी श्रीरामांना दिलेला निरोप ही या विश्‍वातील सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे, असे बापू सांगतात. 

दिन दयाल बिरिदु संभारी| हरहु नाथ मम संकट भारी॥

बापूंच्या मार्गदर्शनानुसार हजारो भक्त ‘सुन्दरकाण्डा’चे नियमित पठण करतात.