साई निवास
सद्गुरु श्रीसाईबाबांच्या नानाविध भक्तांनी साईनाथांची कृपा कशी प्राप्त करून घेतली, याचे वर्णन असलेला, प्रत्येक साईभक्तांसाठी अतिशय प्रिय असा ‘श्रीसाईसच्चरित’ ग्रंथ ज्या वास्तूत लिहीला गेला ती वास्तू म्हणजे ’साईनिवास’. साईनाथांचीच आज्ञा घेऊन ‘श्रीसाईसच्चरित’ या ग्रंथाची निर्मिती करणारे श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकर म्हणजेच ‘हेमाडपंत’ यांचे हे निवासस्थान.
१९१० साली हेमाडंपत श्री क्षेत्र शिर्डी येथे साईनाथांच्या दर्शनास आले. पहिल्याच भेटीत हेमाडपंत यांनी साईनाथांची धूळभेट घेतली आणि ते कायमचे बाबांचे झाले. बाबांनीच त्यांचे ‘हेमाडपंत’ असे नामकरण केले. भक्तांना साईनाथांचे आलेले अनुभव, त्यांच्या लीला या सर्व कथारूपात संग्रहीत करण्यासाठी हेमाडपंतानी ’श्रीसाईसच्चरित’ हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली.
‘मी तो केवळ पायांचा दास । नका करू मजला उदास । जोवरी या देही श्वास । निजकार्यास साधूनि घ्या ॥’
ही ओवी आपल्या जीवनात उतरवत हेमाडपंतानी त्यांच्या ‘साईनिवास’ या वास्तूमध्ये ’श्रीसाईसच्चरित’ ग्रंथ लिहिला. आज वांद्रे येथील या वास्तूला शंभरहून अधिक वर्ष झाली आहेत. या वास्तूचा उल्लेख ‘साईसच्चरित’ ग्रंथात येतोच.
हेमाडपंतानी साईनाथांच्या परवानगीने १९११ साली ही वास्तू बांधण्यास सुरुवात केली. वास्तूंची रचनाही साईनाथांनी सांगितल्याप्रमाणेच केली. हे माझे घर नाही तर साईनाथांचे घर आहे, ही भावना मनात ठेवून ही वास्तू बांधण्यात आली. साधारण १९१३ साली ही वास्तू बांधून पूर्ण झाली व याला ‘साईनिवास’ असे नाव देण्यात आले. हेमाडपंताच्या पुढील पिढ्यांनी या पवित्र वास्तूचे जतन करून ठेवले आहे. आज या वास्तूत हेमाडपंताचे नातू श्री. गोविंद गजानन दाभोलकर (अप्पा दाभोलकर) आणि त्यांचे कुटुंब राहते. साईनाथांच्या प्रेमाने आणि कृपाआशीर्वादाने भरलेल्या या वास्तूचे दर्शन घेण्याची संधी अगदी प्रत्येकाला आहे.
साईनाथांनी हेमाडपंतांना दिलेल्या दृष्टांताप्रमाणे १९१७ साली होळी पौर्णिमेच्या दिवशी साईनाथांचे तसबिरीच्या रूपात ‘साईनिवास’ मध्ये आगमन झाले. याची कथा साईसच्चरिताच्या ४०व्या अध्यायात वाचायला मिळते. साईनाथांच्या आगमनाचा दिवस आज साईनिवासमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
या साईनिवास संदर्भात आणखी एक गोष्ट ’साईनिवास’ या सिडीमधून ’सद्यपिपा’ म्हणजेच अप्पासाहेब दाभोलकर याच्याद्वारे आपल्या समोर येते. १९९३ सालापासून डॉ. अनिरुद्ध जोशी (सद्गुरु श्रीअनिरुद्ध) यांचे साईनिवासमध्ये येणे-जाणे असायचे. डॉ. जोशी, आप्पासाहेब दाभोलकर आणि त्यांच्या पत्नी मीनावहिनी यांच्याशी श्री साईनाथांवरच बोलायचे. साईनाथांनी देह सोडताना हेमाडपंताकडे तीन वस्तू दिल्या होत्या. हेमाडपंतानी या वस्तू त्यांच्या मुलाकडे सुर्पूद केल्या. त्यांनी आपल्या देहावसनापूर्वी या वस्तू आप्पासाहेब दाभोलकर यांच्याकडे दिल्या. दाभोलकर कुटुंब पिढ्यान्पिढ्या साईनाथांच्या या वस्तू जपून ठेवत होते. हेमाडपंत व त्यांचा मुलगा डॉ. गजानन दाभोलकर यांच्यानंतर केवळ अप्पासाहेब दाभोलकर व त्यांची पत्नी मीनाताई दाभोलकर आणि यांनाच केवळ या वस्तूंबद्दल माहिती होती. बाहेर कोणालाही साईनाथांनी दिलेल्या या वस्तूंबद्दल माहिती नसताना डॉ. अनिरुद्धांनी १९९६ साली साईनाथांनी दिलेल्या या तीन वस्तू त्यांच्याकडून मागून घेतल्या व आपल्या सदगुरुतत्त्वाची खूण पटवून दिली. त्यावेळी दाभोलकर कुटुंबीय सदगुरुंच्या दर्शनाने भारावून गेले.
साईनाथांनी हेमाडपंतांना दिलेल्या दृष्टांताप्रमाणे १९१७ साली होळीला साईनाथ तसबीर रुपात आले होते. याची कथा ‘श्रीसाईसच्चरितील’ ४० व्या अध्यायात येते. पूर्वी साईंची ही तसबीर फक्त होळी पौर्णिमेलाच श्रद्धावानांना दर्शनासाठी ठेवली जायची. मग मीनावहिनीच्या इच्छेने ही तसबीर साईनिवासमध्ये रोज दर्शनासाठी खुली करण्यात आली. तसेच सद्गुरु अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार या तसबीरीची हुबेहूब मोठी प्रतिकृती तयार करण्यात आली. साईनिवासमध्ये याचेही दर्शन श्रद्धावानांना घेता येते. या वास्तूत बसून श्रीसाईनाथांच्या मूर्तीकडे पाहून ‘ॐ कृपासिंधू श्री साईनाथाय नमः’ हा जप करता येतो. त्यावेळी मन अगदी प्रसन्न होते.
हेमाडपंतानी ज्या डेस्कवर हा ग्रंथ लिहिला तो डेस्क साईनिवासमध्ये पहायला मिळतो. साईनिवासच्या मागच्या आवारात मीनावहिनी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘तुलसी वृंदावन’ उभारण्यात आले आहे. तसेच सद्गुरु अनिरुद्धांची पूर्णाकृती प्रतिमा व पादुकांच्या दर्शनाचा लाभ आलेल्या श्रद्धावानांना घेता येतो व श्रद्धावान तुलसी वृंदावनाभोवती प्रदक्षिणाही घालतात. तसेच ह्या ठिकाणी सुदीप प्रज्वलित करता येते.
साईनिवासमध्ये ‘होळी पौर्णिमा’ उत्सव साजरा होतो. २०१७ साली श्रीसाईनाथांच्या तसबीरीला १०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे साईनिवासमध्ये ‘शताब्दी महोत्सव’ साजरा झाला. या निमित्ताने अनेक आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले. ज्या वास्तूला सद्गुरुंच्या दोन रूपांचा अनुभव लाभला आहे अशा वास्तूमध्ये सद्गुरु नवरात्र साजरी करता येते असे मानले जाते. ही नवरात्र अश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून दसर्यापर्यत साजरी केली जाते. साईनिवासमध्ये सद्गुरु नवरात्र सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार १९९७ वर्षापासून साजरी करण्यात येत आहे. साईनिवास मध्ये रोज संध्याकाळी सात वाजता आरती होते आणि त्यानंतर हरिपाठ/शिवपाठ/अनिरुद्धपाठ /गणपती अथर्वशीर्ष यापैकी एकाचे पठण होते.
साईनिवासचा पत्ता व दर्शनाची वेळ –
साईनिवास ही वास्तू मुंबईमध्ये वांद्रे स्टेशनपासून १० मी. च्या अंतरावर आहे.
पत्ता- साईनिवास, सेंट मार्टिन रोड, वांद्रे (पश्चिम) मुंबई ४०० ५३.
दर्शनाची वेळ :
सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत व सायंकाळी ४.३० ते रात्रौ १० वाजेपर्यत.
गुरुवारी – सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत.