श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती

‘श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती’ ही श्रद्धावान स्त्रियांसाठी असणारी एक महत्त्वपूर्ण पर्वणी आहे. आदिमाता चण्डिकेची प्रपत्ती करणारी स्त्री ही स्वत:बरोबरच घराचे, समाजाचे, देशाचे रक्षण करण्यास समर्थ बनते आणि या प्रपत्तीतून प्राप्त होणार्या आत्मिक बलाने समर्थ झालेली स्त्री ही स्वत:बरोबरच घर-परिवार, समाज, देश आणि धर्म यांचा विकास करण्यास समर्थ असते. सद्​गुरु श्रीअनिरुद्धांनी एका प्रवचनात स्त्रियांच्या प्रपत्तीचे महत्त्व सांगताना केलेल्या बोधाचा हा सारांश आहे.

‘रामराज्य’ या महत्त्वपूर्ण प्रवचनात सद्​गुरु श्रीअनिरुद्धांनी स्त्रियांच्या ‘श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती’ची घोषणा केली. ‘श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती’ स्त्रीला पराक्रमी, बनवते. या प्रपत्ती शब्दाचा अर्थ सांगायचा झाल्यास आपत्तीनिवारण करणारी शरणागती असा याचा अर्थ आहे. तसेच ही मंगलचण्डिकाप्रपत्ती ही परमात्म्याची माता असणार्या आदिमाता चडिण्केच्या चरणी अर्पण केली जाते. स्त्रिया ही प्रपत्ती संक्रांतीच्या दिवशी म्हणजे १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरी करतात कारण ह्याच संक्रांतीच्या दिवशी आदिमाता महिषासुरमर्दिनीने महिषासुराला मारण्यासाठी पृथ्वीवर ॠषि कर्दम व देवहूति यांच्या कतराज आश्रमामध्ये पहिले पाऊल ठेवले होते.

म्हणूनच संक्रातीच्या दिवशी सूर्यास्तानंतर ‘श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती’ केली जाते. सूर्यास्तानंतर का? कारण महिषासुरमर्दिनीने सूर्यास्तानंतर कतराज आश्रमात पहिलं पाऊल टाकलं. सूर्य असताना माता महिषासुरमर्दिनी आली असती तर तिचे तेज मानवांना सहन झाले नसते, त्यामुळे तिने सूर्यास्तानंतर पहिले पाऊल टाकले.

संक्रातीच्या दिवशी सूर्यास्तानंतर मोकळ्या जागी स्त्रियांनी एकत्र येऊन ही प्रपत्ती करायची असते. ही प्रपत्ती केल्यामुळे प्रत्येक स्त्रीला तिच्या कुटुंबाची रक्षणकर्ती सैनिक अर्थात्​‘बॉडीगार्ड’ बनण्यासाठीचे आत्मिक बल प्राप्त होते, मग ती स्त्री आई, पत्नी, बहीण कोणत्याही भूमिकेत असो. प्रपत्ती केल्याने ती रक्षणकर्ती बनते. शक्यतो ही प्रपत्ती मोकळ्या जागी म्हणजेच समुद्र किंवा नदीकिनारी, मैदानात, बाल्कनीमध्ये, चाळीच्या कठड्याजवळ करायची. या प्रपत्तीसाठी जेवढ्या जास्त स्त्रिया एकत्र येतील तितके चांगले. सोळा वर्षांवरील कुठलीही स्त्री ही प्रपत्ती करू शकते. पहिल्या वर्षी प्रपत्ती केल्यावर दरवर्षी ती करणे बंधनकारक नाही. 

प्रपत्तीची विधी

एका चौरंगावर किंवा पाटावर मोठी परत घ्यावी. परातीत गहू, त्यावर कळशी किंवा कलश घ्यावा. त्यामध्ये तांदूळ, कळशीवर ताम्हण आणि ताम्हणात देवीची दोन पावले काढावीत. उजवं पाऊल कुंकवाचं तर डावं पाऊल हळदीचं असलं पाहिजे. त्या परातीमध्ये कलशाला टेकून स्वयंभगवान त्रिविक्रमाची तसबीर ठेवावी. ही झाली पूजेची मांडणी.  

स्त्रियांनी पूजेसाठी येताना तबक आणि सोबत पूजनद्रव्ये घेऊन यावे. पूजनद्रव्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा, केळी, काकडी किंवा दुधी, श्रीफळ म्हणजेच नारळ, गाजर, मुळा किंवा तोंडली, उडदाची डाळ, तिळाचं तेल, दही, हळद (हळकुंड नाही), आलं, गूळ, चिंच, उसाचे कांडे सुंगधी फुले आणि अभिचारनाशक पुरचुंडी असते. विड्याचे पान, त्यामध्ये मीठ, मोहरी आणि कापूर घालून त्या पानाला दोर्याने बांधायचे आणि ही पुरचुंडी करायची, ही झाली अभिचारनाशक पुरचुंडी.

हे पूजाद्रव्यांनी भरलेले तबक हातात घेऊन स्त्रिया प्रपत्ती करायच्या स्थळी उभ्या राहतील. त्यांच्यातील वयाने मोठी असलेली स्त्री ‘माते गायत्री, सिंहारूढ भगवती-महिषासुरमर्दिनी, क्षमस्व चडिण्के, जय दुर्गे, अखिल विश्व की जननी माँ उदे उदे उदे उदे उदे’, ही माता महिषासुरमर्दिनीची आरती करेल. त्यापाठोपाठ बाकीच्या स्त्रिया ही आरती म्हणतील.

त्यानंतर तबक हातात घेऊन प्रत्येक स्त्रीने चण्डिकेच्या पदचिन्हस्थानास अर्थात्​कतराज आश्रमास फेर धरल्याप्रमाणे नऊ प्रदक्षिणा करायच्या. ते करत असताना श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र मोठ्याने म्हणायचा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर अभिचारनाशक पुरचुंडीने त्रिविक्रमाची दृष्ट काढायची. ‘बाबा रे! माझ्या घरावर असणारी कुठलीही कुदृष्टी, कुबुद्धी या सगळ्यांचा तू तुझ्या आईच्या सहाय्याने नाश कर!’, अशी प्रार्थना करून मग ती पुरचुंडी परातीत, होमकुंडात किंवा खड्ड्यामध्ये कापूर आणि समिधांच्या सहाय्याने जो अग्नी निर्माण केला असेल, त्यामध्ये अर्पण करायची. हा निर्माण केलेला अग्नी म्हणजे महिषासुरमर्दिनीचे तेजोवलयम्. या कृतीने घराची सर्व जबाबदारी त्रिविक्रमावर सोपवली जाते. श्रीगुरुक्षेत्रम् मंत्रामुळे अग्नीचं रूपांतरण तेजोवलयम्​मध्ये होतं. घरावर असलेली कुदृष्टी, कुबुद्धी, कुकर्म ह्या तेजोवलयम्​मध्ये गेल्यामुळे घराचं कल्याण होतं असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.

पूजन झाल्यावर ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ हा मंत्र नऊ वेळा म्हणत सर्व स्त्रियांनी या पावलांवर अक्षता वाहाव्यात व त्रिविक्रमास सुगंधी फुले अर्पण करावीत. तसेच तेजोवलयम्​च्या अग्नीस कडुलिंबाच्या पाल्याने शांत करावे. नंतर जमलेल्या सर्व स्त्रियांनी त्या पावलांतील हळद-कुंकू घरी न नेता स्वतःच्या कपाळाला किंवा गळ्याला लावावे. प्रसाद म्हणून दिले गेलेले केळे तिथल्या तिथेच ग्रहण करावे, तर दही घरातल्या पुरुषांना द्यावे. पुरुषमंडळी नसतील तर कुठल्याही वृक्षाच्या मुळाशी ते अर्पण करावे. ऊस स्त्रियांनी घरी नेऊन स्वतः रोज थोडा थोडा खावा. तबकातल्या उरलेल्या पूजाद्रव्यांचे सांबार बनवून घरातल्या स्त्रिया अणि पुरुषांनी पोळी आणि भाताबरोबर खावे. चवीसाठी मसाला आणि आरोग्यासाठी कडीपत्ता जरूर घालावा. मात्र त्यादिवशी इतर कुठलीही भाजी करू नये. पूजन झाल्यावर स्त्रिया ’जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी’ या गजरावर फेर धरून या प्रपत्तीचा मनसोक्त आनंद लुटू शकतात.

२०११ सालापासून मकरसंक्रांतीच्या दिवशी सर्व श्रध्दावान वीरा बापूंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सामूहिक श्रीमंगलचण्डिकाप्रपत्ती अगदी जल्लोषात साजरी करत आहेत. श्रध्दावान वीरांच्या बरोबरीने इतर महिलाही या प्रपत्तीमध्ये सहभागी होतात. ही प्रपत्ती देशासाठी, कुटुंबासाठी मी करते आहे, याचे समाधान मकर संक्रांतीच्या दिवशी ही प्रपत्ती करणार्या प्रत्येक श्रद्धावान स्त्रीच्या चेहर्यावर दिसत असते. दरवर्षी या सामूहिक प्रपत्ती सोहळ्यात सहभागी होणार्या स्त्रियांची संख्या वाढतच आहे.

Leave a Reply