अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम
“रामनाम सबसे पवित्र नाम है, गुरू नाम सबसे पवित्र नाम है | मैं इस रामनाम की, इस भगवत्-नाम की बैंक खोल रहा हूँ |”
– सद्गुरु श्री अनिरुद्ध
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या या शब्दांसह, सर्वसामान्य श्रद्धावानाचे जीवन आनंदी व सुखी करण्याच्या उद्देशाने १८ ऑगस्ट २००५ रोजी एका अनोख्या व आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्याचं नावं आहे, ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’!
रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे ।
सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥
“रामरक्षा स्तोत्रामध्ये शिव पार्वतीला सांगतात, “हे मनोरमे, राम, राम, राम अशा नामोच्चाराने मी मनाला आनंद देणार्या श्रीरामाच्या ठायी रममाण होतो. रामनाम हे विष्णूच्या सहस्त्रनामांएवढेच तुल्यबळ आहे.” या स्तोत्रमंत्ररूपी रामरक्षेमधून रामनामाची महती आपल्याला कळते
बँक, बँकेचे व्यवहार आणि त्याचे नियम म्हटले की अजूनही सर्वसामान्य व्यक्तीला काहीसं चाचरायला होतं. पण ‘रामनामा’ची ही बँक सर्व प्रकारची भीती, अडचणी व चिंतांना दूर सारणारी आहे. प्रत्येक श्रद्धावानाला आपलीशी वाटणारी आणि सहजसोप्या नियमांवर आधारलेली!
‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ स्थापना झाल्यानंतर पहिल्या तीस दिवसातच या बॅंकेत ३६,३३९ अकाउंट उघडण्यात आले व ६२१५८ रामनामाच्या वह्या जमा करण्यात आल्या.
रामनामाची वही व महत्त्व –
‘रामनाम वही’ ही २२० पानांची वही आहे, जी भक्तांना सोप्या स्वरूपात भगवत्नाम, गुरुनाम लिहिण्याबरोबरच नाम-उच्चारणाचीही सुवर्णसंधी देते. ह्या वहीत पहिल्या १०८ पानांवर ‘राम’ नाम लिहायचे असते. पुढील प्रत्येकी २८ पानांवर अनुक्रमे ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ’कृष्ण’, ’दत्तगुरु’ व ’जय जय अनिरुद्ध हरि’ हा मंत्र लिहायचा असतो. रामनाम वहीच्या प्रत्येक पानावर भक्तिमार्गाचा अग्रणी, श्रीरामप्रभूंचा दास असणार्या श्री हनुमंताच्या साक्षीने प्रत्येक नाम लिहीले जाते.
श्रीहनुमंताच्या आकृतिबंधात ‘राम’ नाम लिहिण्याचे महत्त्व खूप वेगळे आहे. जेव्हा आपल्या श्रद्धेय सीतामाईला लंकेमधून आणण्यासाठी ‘श्रीरामेश्वर ते लंका’ असा अभेद्य सेतू वानरसैनिकांना बांधायचा असतो, तेव्हा स्थापत्यशास्त्रातील अत्युच्च आचार्य असणार्या भौम ऋषींकडे शिक्षण घेतलेले नल व नील हे वानरवीर हा सेतू बांधण्याच्या कार्यास सुरुवात करतात. परंतु कार्याचे व्यापकत्व व दुर्गमता जाणून श्रीहनुमंत वेळीच पुढे सरसावतात व समुद्रात टाकल्या जाणार्या प्रत्येक पाषाणावर स्वहस्ते ‘श्रीराम’ नाम लिहू लागतात. श्रीरामनामाने अजीव व जड पाषाणही पाण्यात बुडत नाहीत, तर तरंगतात व त्यांच्या समुदायाने समुद्रावर सेतू बांधला जातो. श्रद्धावान जेव्हा रामनाम वही लिहीत असतो, तेव्हा त्याच्याही जन्मजन्मांच्या प्रवासातील अनेक सुंदर सेतू असेच सहजतेने श्रीहनुमंत बांधून घेतात, अशी श्रद्धावानांची भावना आहे.
या रामनाम बॅंकेचे महत्त्व सांगताना सद्गुरु श्री अनिरुद्ध म्हणतात,‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाचा एक महामार्ग, जो सरळसाध्या श्रद्धावानालाही सुखी जीवनाच्या वाटेवर घेऊन जातो, त्याला भक्कम आधार देतो.’
अशाप्रकारे जप लिहीण्याचा कोटीगुणे लाभ सर्व श्रद्धावान मित्रांनाही मिळावा ह्या तळमळीपोटीच सद्गुरु श्री अनिरुद्धांनी ही रामनामाची वही दिली.
रामनाम वहीतील पाचही मंत्र जिवंत आहेत, रसमय आहेत. हनुमंत चिरंजीव आहे व अखंड रामनामाचा जप करतो. जेव्हा मी रामनाम उच्चारतो, तेव्हा ते रामनाम आपोआप हनुमंताच्या उच्चारात सामावले जाते. थोडक्यात, रामनाम वही लिहिताना मी एकटा नाही, तर हे नाम ‘जो’ नित्यत्वाने उच्चारत आहे, त्याच्याशी मी सहज जोडला जातो, हा महत्वाचा लाभ रामनाम वही लिहिण्याने मला मिळतो.
काही विशेष प्रसंगी म्हणजेच वाढदिवस, लग्न अशा निमित्ताने किंवा आपल्या आप्तांच्या सुख व समृद्धीच्या प्राप्तीसाठी त्यांच्या नावे वही लिहून जमा करता येते. ही वही जो श्रद्धावान लिहितो त्यालाही आणि ज्याच्या नावे ही वही लिहिली आहे त्यालाही याचा लाभ मिळेल. मृत व्यक्तीच्या नावे रामनाम वही लिहिली, तर दिवंगताला रामनामामुळे पुढची गती अधिक चांगली मिळते अशी श्रध्दावानांची भावना आहे.
रामनाम वही लिहिताना लिहिणार्याच्या हातून नवविधा भक्तीतील श्रेष्ठ ‘श्रवण’ भक्ती घडतेच कारण नाम लिहिताना डोळ्यांनी ते वाचले जाणार आहे, जप मनाने उच्चारला जाणार आहे व त्याच वेळी त्याचे सहज श्रवणही होणार आहे, म्हणूनच रामनाम वही म्हणजे सहज भक्ती करण्याचे, ध्यान करण्याचे पवित्र साधन आहे.
अंजनामाता वही
भगवंताशी सामिप्य अधिक वाढावे व भक्तिमार्गावर अधिकाधिक आणि वेगाने प्रगती करता यावी, यासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी २०११ साली ‘श्रीवरदचंडिका प्रसन्नोत्सवा’त ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ला एक अनोखी भेट दिली. ही भेट होती, अंजनामाता वहीची!
अंजनामातेचा (आदिमाता अंजनीचा) पुत्र म्हणजे महाप्राण हनुमंत. हा एकमेव ‘हनुमंत’च असा आहे, ज्याने ‘स्वाहा’ (पूर्ण समर्पण) व ‘स्वधा’ (पूर्ण स्वावलंबन, स्वयंपूर्णता) हे दोन्ही गुण धारण केले आहेत. म्हणूनच हा स्वधाकार प्राप्त करून घेण्यासाठी ‘ॐ हरिमर्कटाय स्वाहा’ हा मंत्र हनुमंताच्या डाव्या चरणाच्या खाली लिहिला जाईल अशी रचना ह्या वहीमध्ये केलेली आहे.
सभासदत्व व लाभ
‘रामनाम’ आणि त्याचबरोबर इतर जप लिहिणे हेच या आगळ्यावेगळ्या बँकेचे भक्तिचलन आहे. कमीत कमी एक वही लिहून ती जमा केली की ह्या रामनाम बँकेचा सभासद होता येते. सभासद झाल्यावर प्रत्येक श्रद्धावानाला एक पासबुक दिले जाते.
सद्गुरु श्रीअनिरुद्ध (बापू) सांगतात की, श्रद्धावानाला जेव्हा संकट काळात मदतीची, आधाराची खरी गरज असेल, तेव्हा सद्गुरुतत्व, ते परमतत्त्व त्याला ह्या ‘भक्ति बँकेतून’ आवश्यक तेवढे सहाय्य नक्कीच पुरवणार. ज्याचे त्याच्या सद्गुरुतत्त्वावर जेवढे प्रेम त्याला त्या प्रमाणात त्याचे ‘भक्तिरूपी व्याज’ सहाय्याच्या स्वरूपात मिळते.
बँकेच्या कामकाजाचे वर्ष अनिरुद्ध पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) ते अनिरुद्ध पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा) असे आहे. सर्व ‘सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रं’ ह्या बँकेच्या शाखा आहेत. ही बँक युनिव्हर्सल असल्यामुळे श्रद्धावान आपली लिहून पूर्ण झालेली वही कुठल्याही शाखेत जमा करू शकतात.
प्रत्येकाची वही प्रत्येकाने स्वत:च लिहून पूर्ण करायची आहे. रामनाम वहीच्या पहिल्या पानावर (अर्पण पत्रिकेवर) आपले संपूर्ण नाव, खाते क्रमांक व वही कोणासाठी लिहिली आहे याची माहिती असते. श्रद्धावानांनी अशाप्रकारे जमा केलेल्या प्रत्येक वहीतील पहिली पाने (अर्पण पत्रिका) प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा एकादशीला एकत्र करून त्यांचे पूजन केले जाते.
एका वर्षामध्ये श्रद्धावानाने किमान १८ वह्या जमा केल्यावर त्या श्रद्धावानाला त्या वर्षाचे बॅंकेचे वार्षिक सभासदत्व मिळते. खाते उघडलेल्या तारखेपासून पुढील पाच वर्षात १५० वह्या जमा केल्या, तर तो श्रद्धावान बँकेचा आजीव सभासद होतो. वही लिहिणार्या श्रध्दावानाला ठराविक वह्या लिहिल्यानंतर विशिष्ट लाभ मिळतात. श्रद्धावानांनी जमा केलेल्या ह्या रामनाम वह्यांपासूनच गणेशमूर्ती व सच्चिदानंद पादुका तयार केल्या जातात. त्यामुळे ही ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ भक्तिच्या पवित्र साधनाबरोबरच प्रत्यक्ष जीवनात आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासही मोलाचे योगदान देते.
डिजीटल रामनाम वही
आजच्या घडीला लाखो श्रद्धावान सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी २००५ साली सुरू केलेल्या आगळ्यावेगळ्या बँकेचे खातेदार होऊन भक्तीमार्गावरील सहजसोप्या प्रवासाचा आनंद लुटत आहेत.
परंतु बदलत्या काळाला अनुसरून या रामनाम वहीचे नवे अनोखे स्वरूप सद्गुरू श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानूसार श्रद्धावानांना उपलब्ध करून देण्यात आले.
श्रद्धावानांचा वाढता प्रतिसाद आणि तंत्रज्ञानाच्या वापराची सांगड घालून ७ ऑगस्ट, २०१८ रोजी ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’ची अत्याधुनिक व प्रगत अशी ‘डिजिटल’ आवृत्ती सादर करण्यात आली. स्मार्टफोन्स व टॅबमध्ये सर्वाधिक वापर असणार्या ‘ऍन्ड्रॉईड’ प्रणालीवर आधारित ‘ऑनलाईन/डिजिटल रामनाम वही’ उपलब्ध करून देण्यात आली. ‘ऍप्लिकेशन’ अर्थात ‘ऍप’च्या स्वरुपात आलेल्या या डिजिटल आवृत्तीच्या रुपात रामनामाची पूर्ण बँकच आता थेट श्रद्धावानांच्या हाती आली आहे.
गुगलच्या प्ले – स्टोअर वर ‘https://play.google.com/store/apps/details?id=com.ramnaam_bank.ramnaambook’ या संकेतस्थळावर हे ऍप सर्वांसाठी उपलब्ध आहे. या ऍपद्वारे ‘अनिरुद्धाज् युनिव्हर्सल बँक ऑफ रामनाम’मध्ये नवा अकाऊंट (खाते) उघडणे, रामनामाची वही घेणे आणि रामनाम लिहिणे या गोष्टी अगदी सहजगत्या करता येतात. त्याही अगदी जागच्या जागी! एकदा वही घेतल्यानंतर इंटरनेट नसलं तरी म्हणजेच ‘ऑफलाईन’ असतानादेखील रामनाम लेखनात खंड पडणार नाही, याची काळजी ‘ऍप’मध्ये घेण्यात आली आहे. वही पूर्ण झाल्यावर ती सहजपणे आपल्या अकाऊंटमधे ‘ऍड’ होण्याची व खातं अपडेट करण्याची सुविधाही ऍपमध्ये आहे.