श्रीक्षेत्र देहू-आळंदी रसयात्रा (१९९८)
शिर्डी व अक्कलकोट ह्या दोन रसयात्रांच्या भक्तिरसाने भरलेल्या स्मृती हृदयात साठवणार्या श्रद्धावानांना प्रतीक्षा होती ती पुढील रसयात्रेची! १९९८ साली सद्गुरु श्रीअनिरुद्धांसह श्रद्धावानांनी देहू-आळंदी ही तिसरी रसयात्रा केली. श्रीसाई समर्थ विज्ञान प्रबोधिनी ह्या संस्थेच्या विद्यमाने या रसयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. १सप्टेंबर १९९८ रोजी रात्री सर्व श्रद्धावानांनी रसयात्रेसाठी प्रस्थान केले आणि दुसर्या दिवशी पहाटे सर्वजण आळंदीस पोहोचले. प्रत्येक रसयात्रेस श्रद्धावानांकडून चढत्या क्रमाने प्रतिसाद मिळत होता.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या आळंदीस गेल्यावर प्रत्येक श्रद्धावानाला ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रेमरसमय करुणापूर्ण वाणीचे, ज्ञानदेवांच्या ऋणांचे स्मरण होत होते. या रसयात्रेची सुरुवात संत ज्ञानदेव विरचित हरिपाठाने झाली.
‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी| तेणे मुक्ती चारी साधियेल्या॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा| पुण्याची गणना कोण करी॥’
सद्गुरु श्रीअनिरुद्धांसह हरिपाठ म्हणताना सर्वांचे अंत:करण भक्तीने ओतप्रोत भरले होते. हरिपाठानंतर ‘जय हरि विठ्ठल श्रीहरि विठ्ठल….. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल’ ह्या श्रीविठ्ठलाच्या नामगजरात श्रद्धावान मोठ्या उत्साहात सहभागी झाले. त्यानंतर,‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला| वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला॥’ या गजरात सर्वजण भक्तिरंगात रंगून गेले होते.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी सर्वांना रसयात्रेचे महत्व सांगितले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र ग्रंथांच्या दिंडीला सुरुवात झाली. श्रीविठ्ठलाच्या भक्तीत जीवन समर्पित करणार्या संतांद्वारे विरचित ग्रंथ हे श्रद्धावानांसाठी गुरुस्थानी आहेत. स्वत: सद्गुरु श्रीअनिरुद्ध त्यांच्या लेखनात, प्रवचनात अनेक संतवचनांचा उल्लेख करत असतात.
या संतविरचित ग्रंथांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, साईसच्चरित, एकनाथी भागवत या पवित्र ग्रंथांची दिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीत सामिल झालेले श्रद्धावान भक्त ‘जय जय रामकृष्ण हरि’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम……’ यांसारखे गजर करत पालखीसह चालत होते. सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या सहभागाने सार्या भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. या दिंडीला पंढरपूरच्या वारीचे स्वरुप आले होते.
संध्याकाळी सर्वांना ओली चिकणमाती दिली गेली. त्यापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका श्रद्धावानांनी बनविल्या. त्याच वेळी श्रीसाईसच्चरितकार हेमाडपंत (श्री. गोविंद रघुनाथ दाभोलकर) यांचे नातू श्री. अप्पासाहेब दाभोलकर यांनी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या आज्ञेनुसार मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन केले. प्रत्येक श्रद्धावानाने स्वत: बनविलेल्या श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे अर्चनद्रव्याने पूजन केल्यानंतर त्या पादुका शिवलिंगावर अर्पण करण्यात आल्या. त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या गायत्री जपाचे सर्वांनी पठण केले. रात्री सत्संग झाला. हा सत्संग संपूर्ण रात्रभर रंगला होता.
रसयात्रेच्या दुसर्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींची समाधी, अजानवृक्ष, हैबतबाबांची समाधि ह्यांचे दर्शन घेण्यात आले. यावेळी आळंदी संस्थानाकडून परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांचा सत्कार केला. त्यावेळी त्यांनी अतिशय हृद्य आठवणी सांगितल्या. त्याचबरोबर संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई या चारही भावंडांनी जगत्कल्याणासाठी वेचलेच्या कष्टांच्या व त्यांच्या भगवद्भक्तीच्या कथा सांगितल्या.
संध्याकाळी ‘अमृतमंथन’ उपासना झाल्यावर सर्वजण इंद्रायणी नदीच्या काठी गंगापूजन करण्यासाठी एकत्र जमले. इंद्रायणी म्हणजे आळंदीची गंगाच. येथे सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी स्वत: इंद्रायणीमातेचे पूजन करून दीपदान केले व त्यानंतर सर्व भक्तांनी इंद्रायणीच्या प्रवाहात प्रज्वलित दीप अर्पण केले.
रसयात्रेच्या तिसर्या दिवशी सकाळी सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची महती सांगितली व त्यानंतर तेथून सर्वजण देहूला निघाले. देहूला जाऊन सर्वांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे मंदिर, वैकुंठगमनवृक्ष आदि स्थानांचे दर्शन घेतले.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी रसयात्रेचे महत्त्व नेमक्या शब्दात सांगितले. ‘रसयात्रा सुरू झाल्या. दरवर्षी एकेका ठिकाणी. पण आपल्या आयुष्यात रसयात्रा सतत नव्याने सुरू होते व चालूच राहते.’
पुढे भक्तीचं महत्त्व सांगताना सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘ज्ञान-विज्ञानकारिणी भक्ती’, असा अनोखा शब्दप्रयोग केला. ‘ज्ञान व विज्ञान एकत्र येणं आवश्यक आहे, म्हणजेच मला जे आवडते ते आणि जे सत्य आहे ते असं दोन्ही एकत्र यावं. वास्तव व इच्छा यांच्या द्वंद्वांमधून भय निर्माण होतं; तसं होऊ नये म्हणून ज्ञान व विज्ञान एकत्र यायला हवं आणि ते फक्त भक्तीनेच शक्य होतं’, अशा शब्दात ‘ज्ञान-विज्ञानकारिणी भक्ती’ सद्गुरुंनी उलगडून दाखविली.
याचा रसयात्रेशी असलेला संबंध सांगताना ते म्हणाले की, ’अशा भक्तिरसाची अखंड गंगोत्री म्हणजे ज्ञानदेव! संत ज्ञानेश्वरांनी समाजात भक्तिप्रेमाची ज्योत प्रकटविली. कर्मकांडात अडकलेल्या समाजाला एक लहानसा सूक्ष्म धक्का देऊन त्यांनी प्रत्येकाच्या अंतरंगात पवित्र स्पंदने निर्माण केली, ती आजही ही यात्रा करताना आपल्याला मिळालेलीच आहेत आणि आपण ती स्पंदने बरोबर घेऊन जाणार आहोत’, अशा शब्दांत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी या रसयात्रेच्या माध्यमातून भक्तांच्या जीवनात होणार्या सकारात्मक बदलाची जाणीव करून दिली.
यानंतर परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी संत मुक्ताबाईंच्या ‘मुंगी उडाली आकाशी’ ह्या अभंगाचं निरूपण करताना सांगितले की, ‘मुंगी म्हणजे आपली श्रद्धा. जेव्हा ही श्रद्धा आपल्या अंतरंगात पूर्णत्वाला जाते, तेव्हा तिचे सामर्थ्य खूप मोठे होते.’
शेवटी त्यांनी आवडत्या काव्याच्या दोन ओळी म्हटल्या –
‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे, घेणार्याने एक दिवस देणार्याचे हात घ्यावे’॥
याचं स्पष्टीकरण करताना त्यांनी सांगितले की ‘दान देणार्याप्रमाणेच घेणार्याचे हातही ‘दानी’ व्हावेत.’
अशा प्रकारे तीन दिवस भक्तिरसाची लयलूट करून सर्व भक्तगणांच्या सकारात्मक जीवनप्रवासाच्या नवा टप्प्याला सुरुवात झाली.