हनुमान पौर्णिमा
हनुमंत, मारुती, अंजनीसुत, केसरीनंदन अशा असंख्य नावांनी भारतवर्षात अगणित श्रध्दावान ज्याचे पूजन, जप नित्याने करतात आणि त्याची स्तुती असलेली स्तोत्र आनंदाने गातात, तो हनुमान. संकटरक्षक म्हणून कोणत्याही अडचणीत सापडल्यास ज्याचा धावा पहिल्यांदा श्रद्धवानांकडून केला जातो, तो हनुमान. बलाची आणि सामर्थ्याची देवता म्हणून बलउपासक ज्याला आपला मानतात तो हनुमान. भारतात चैत्र पार्णिमा ही ‘हनुमान पौर्णिमा’ म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. हनुमंताच्या असंख्य नामांमध्ये सर्वात श्रेष्ठनाम मानलं जातं, ते ‘सीताशोकविनाशन’, हे नाम. या नामाशीच चैत्रातील पोर्णिमेला ‘हनुमान पौर्णिमा’ का साजरी केली जाते, याची कथा जोडलेली आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी (बापू) श्रद्वावानांना आपल्या प्रवचनातून अनेक वेळा ही कथा समजावून सांगितली आणि या भीमरुपी महारुद्राची भक्ती करण्यासही शिकविले.
बापूंनी श्रद्धवानांना हनुमान जयंतीचे महत्व सांगितले आहे. ‘रामायणातली कथा नीट ऐकली तर कळेल की, ज्या दिवशी हनुमंताच्या जन्म झाला तेव्हा अवघ्या काही क्षणात सूर्याला एक लाल रंगाचे फळ समजून ते खाण्यासाठी हनुमंताने आकाशात झेप घेतली. त्याच वेळेस राहू सूर्याला गिळायला आला होता, म्हणजेच त्यादिवशी सूर्यग्रहण होते व सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येलाच असते.’
‘हनुमान ज्या दिवशी अशोकवनात रावणाच्या बंदीवासात असलेल्या माता जानकीला प्रथम भेटला व तीला रामाची अंगठी देऊन स्वतः रामदूत असल्यासी खूण पटवली. त्यामुळे माता जानकीने हनुमंताला आपला पुत्र म्हणून त्याचवेळी तात म्हणूनही स्वीकारले’ तो दिवस म्हणजे ही हनुमान पौर्णिमा.
याच दिवशी ‘रामाचे आराध्य दैवत असणारे शिव, त्या शिवाचे हे महारुद्र स्वरुप माता सीतेने ओळखले. हनुमंताने अशोकवनात असलेल्या सीतेचे शोकहरण केले, त्यामुळेच हनुमंताला ’सीताशोकविनाशन’ असे नाम मिळाले. याच दिवशी हनुमंत रावणालाही भेटला. त्याला उपदेश करून चूक सुधारण्याची संधी दिली. तसेच गर्वाने हनुमंताच्या दर्भपुच्छास आग लावण्यास सांगणार्या रावणाच्या लंकेचे दहनही केले.’, हेच ते हनुमान पौर्णिमेचे माहात्म्य.
अशा प्रकारे हनुमंतानी अशुभ कार्याचा नाश करण्यास सुरवात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी केली, म्हणुन हा शुभ दिवस खर्या अर्थाने हनुमंताचा जन्म दिवस आहे.
हनुमंताने भारतवर्षाच्या दक्षिण टोकावरून एका उडीत लंकेत जाण्याची आणि तेथे सीतेला भेटून श्रीरामांचा संदेश देण्याची, त्यानंतर रावणाला प्रिय असलेल्या अशोकवनाला उध्वस्त करून पुन्हा परत येऊन रामाला भेटण्याची कथा म्हणजे ‘सुंदरकांड’. या ‘सुंदरकांडा’चे पठण करण्याचे, नित्य नियमाने रोज किमान तीन वेळा ‘हनुमान चलिसा’ म्हणण्याचे, तसेच ‘मारुतीस्तोत्र’ व ‘पंचमुख हनु्मत्कवच’ नेहमी म्हणण्याचे मार्गदर्शन बापूंनी श्रद्धवानांना केले आहे. पितृवचनातून याचे महत्त्व आणि हनुमंताच्या या जपस्तोत्राचा अर्थही अनेकवेळा समजून सांगितला. बापूंच्या मार्गदर्शनुसार असंख्य श्रद्धावान या स्त्रोताचे पठण नित्यनियमाने करतात.
सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी रत्नागिरी येथील ‘अतुलितबलधाम’ येथे पंचमुखी हनुमंताची मूर्ती स्थापन केली आहे. हनुमान पौर्णिमेचा भक्तिमय उत्सव तेथे दरवर्षी साजरा करण्यात येतो. हनुमंत हे सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे ‘रक्षकगुरु’ आहेत. दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे मुख्य स्टेजवर उपासनाप्रतिकांबरोबरच श्रीहनुमंताची मोठी तसबीरही लावलेली असते. ‘ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:।’ हा जप गुरुवारच्या उपासनेत सामूहिकरित्या म्हटला जातो. हाच जप हनुमान पौर्णिमेच्या दिवशी अखंडपणे श्री अतुलितबलधाम येथे केला जातो. असंख्य श्रद्धवान या उत्सवात सहभागी होतात.
‘श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’ येथे असलेल्या क्षमा यंत्राची अधिष्ठात्री देवता हनुमंतच आहे. चण्डिकाकुलातही हनुमंत आत्मलिंगासोबत विराजमान आहेत. दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम येथे होणार्या श्रीशब्दध्यानयोगमधील आज्ञाचक्राची देवता हनुमंतच आहे. सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी शिळेतून हनुमंताची मूर्ती कोरलेली आहे ज्याचे दर्शन सर्व श्रद्धावान श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती पूजनाच्या वेळेस जुईनगर गुरुकुल येथे घेऊ शकतात.
दरवर्षी ‘श्रीगुरुचरणमासा’मध्ये (म्हणजे वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा अर्थात, ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा ते आषाढ महिन्याची पौर्णिमा ह्या कालावधीमध्ये) दररोज एकदा तरी हनुमानचलिसाचे पठण करावे. या महिनाभरात किमान एका दिवशी १०८ वेळा हनुमानचलिसाचे पठण करावे, असे बापूंनी श्रद्धवानांना सांगितले आहे. या काळात हनुमान चलिसाचे पठणाचे महत्त्व याच्याशी संबंधीत तुलसीदासांची कथाही बापूंनी श्रद्धवानांना सांगितली. त्यामुळे असंख्य श्रद्धावान या काळात हनुमान चलिसाचे जास्तीजास्तवेळा पठण करतात.
हा हनुमंत प्रत्येक मानवात ’महाप्राण’ ह्या रुपात असतोच. हनुमंत म्हणजे श्रद्धावानांचा रक्षणकर्ता. बिभीषणाला रामापर्यंत पोहोचवणारा हनुमंतच आहे. रामाच्या कार्यात स्वतःला कसे झोकून द्यावे, त्याची भक्ती कशी करावी हे आम्हाला हनुमंतच शिकवितो. या रामकार्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. वानरराज सुग्रीव याची रामाशी भेट घडवून त्याला वालीकडून त्याचे राज्य परत मिळवून देतो, वानरसैन्यासमोर रामाचे गुणसंकीर्तन करून त्या सर्वांना रामकार्यात सहभागी करून घेतो, स्वत: ’बुध्दिमताम् वरिष्ठम्’ असूनही अंगदाच्या नेतृत्वाखाली सीतेला शोधण्याचे कार्य करतो, रावणाच्या दरबारात स्वतःला बंधनात बांधून घेतो, राक्षसांकडून अवहेलनाही स्वीकारतो. त्या हनुमंताच्या स्तोत्र, जपाचे पठण करून श्रद्धावान दरवर्षी हनुमान पौर्णिमा साजरी करतात.
प्रत्येक माणसाचा भक्तिमार्गावरील प्रवास, त्याचे भक्तिमार्गावरील प्रत्येक पाऊल हे हनुमंताच्या मार्गदर्शनानेच पुढे टाकले जाते. श्रीहनुमंतच बोट धरून श्रद्धावानाला भक्तिमार्गाने पुढे नेतो म्हणूनच हनुमंतांची भक्ती आवश्यक ठरते, असे बापूंनी श्रद्धावानांना सांगितले आहे. त्यामुळे हनुमान पौर्णिमा श्रद्धावान आनंदाने साजरी करतात.