गोवा रसयात्रा – श्री क्षेत्र मंगेशी व शांतादुर्गा
शिर्डी, अक्कलकोट व देहू-आळंदी रसयात्रेनंतर १९९९ साली श्री अनिरुद्ध बापू यांनी श्री क्षेत्र मंगेश व शांतादुर्गा – गोवा रसयात्रा काढली. ही चौथी रसयात्रा होती. परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी म्हणजेच बापूंनी अनेक वेळा ‘शिवं ज्ञानोपदेष्टारं’ हा सिद्धान्त आपल्या प्रवचनांमध्ये सांगितला आहे. शिव हा ज्ञानोपदेष्टा आहे म्हणजे ज्ञानाचा उपदेश करणारा आहे, अज्ञानाचा नाश करणारा आहे. त्याचप्रमाणे या विश्वावर जिची सत्ता आहे, त्या जगदंबेची शक्तिरूपात साधना न करता तिच्या मातृरूपाची भक्ती करणेच उचित आहे, हेदेखील बापुंनी अनेकवार सांगितले आहे.
अशा या विश्वाच्या जनक – जननीच्या अर्थात मंगेश – शान्तादुर्गा यांच्या पवित्र श्रीक्षेत्राची रसयात्रा १६ मे १९९९ रोजी प्रारंभ झाली. रसयात्रेच्या पहिल्याच दिवशी भर उन्हाळ्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि सार्यांचाच सुखावह प्रवास सुरू झाला. पहाटे तीन वाजल्यापासून गोवा, कवळेगाव येथील रामनाथीच्या मंदिरात श्रद्धावान येण्यास सुरुवात झाली. अनेक श्रध्दावानांनी सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या छत्रछायेत ह्या रसयात्रेचा लाभ घेतला. या विश्वाच्या जनक-जननीच्या अर्थात् मंगेश – शांतादुर्गा यांच्या पवित्र श्रीक्षेत्राची रसयात्रा सद्गुरुंसह करण्यासाठी सर्वच श्रद्धावान उत्सुक होते.
सोमवार दिनांक १७ मे रोजी श्री क्षेत्र मंगेश व शांतादुर्गा – गोवा रसयात्रेचा पहिला दिवस उजाडला. सकाळी दहा वाजल्यानंतर रामनाथी दर्शन सोहळा सुरू झाला. त्यावेळी श्री रामनाथीला महाभोग अर्पण करण्यात आला. दर्शनाचे वेळी श्रद्धावान सामूहिकपणे शिवपाठ म्हणत होते. श्रद्धावान त्या भक्तिमय वातावरणात रममाण होऊन शिवपाठात रंगून गेले होते, शिवनाम घेत नाचत होते.
त्यानंतर श्री विष्णुपाद आणि श्रीकृष्णाची पालखी निघाली. हा पालखी सोहळा तीन ते साडेतीन तास रंगला होता. सर्व श्रद्धावान जेवण आणि विश्रांती घेऊन संध्याकाळी ४ वाजता ‘अमृतमंथन’ उपासना करण्यास हजर झाले. सद्गुरु श्री अनिरुद्धांनी सर्वांना ह्या उपासनेचे महत्त्व समजावून सांगितले व उपासनेस प्रारंभ झाला. उपासनेसमयी प्रत्येक भक्ताने ओल्या मातीच्या गोळ्यापासून शिवलिंग तयार केले व त्यावर अर्चनद्रव्याने अभिषेक व पूजन केले.
ह्या वेळेस श्रीसच्चिदानंद नवनीत पादुका पूजनही संपन्न झाले. त्यावेळी ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥’ ह्या मंत्रोच्चाराचे पठण झाले. त्यानंतर शिवलिंग पूजन झाले ह्या वेळेस ‘ॐ भू र्भूव: स्वः। ॐ तत्पुरुषाय विद्महे। महादेवाय धीमहि। तन्नो रुद्रः प्रचोदयात्॥’ ह्या शिवगायत्री मंत्राचे पठण करण्यात आले. त्यानंतर ‘ॐ नीलग्रीवाय विद्महे। गौरीनाथाय धीमहि। तन्नो मांगिरीश: प्रचोदयात्॥’ ह्या श्री मंगेश-गायत्री मंत्राचा जप करण्यात आला. मग सर्वांनी मिळून ‘ॐ शिवप्रियायै विद्महे। सर्वशक्त्यै च धीमहि। तन्नो शांतादुर्गा प्रचोदयात्॥’ या श्री शांतादुर्गा गायत्री मंत्राचा जप केला. यानंतर सर्व श्रद्धावानांनी मिळून ‘मंगेशा तू भक्ती दे रे, शांतादुर्गे शक्ती । भक्ती करूनी मिळवू देवा, पापापासून मुक्ती ॥’ हा गजर म्हटला आणि उपासनेची सांगता झाली. या उपासनेनंतर सर्वांनी सत्संगाचा आनंद लुटला.
दुसर्या दिवशी म्हणजे मंगळवार दि. १८ रोजी सकाळी अल्पोपाहार करून सर्व श्रद्धावान श्री शांतादुर्गा उपासनेसाठी एकत्र जमले. उपासना झाल्यानंतर महाभोग अर्पण करून शांतादुर्गामातेचे दर्शन घेण्यासाठी सर्वांनी शांतादुर्गा मंदिराकडे प्रस्थान केले.
संध्याकाळी ६ वाजता श्री अमृतमंथन विधी सुरू झाला. ही एक विलक्षण उपासना होती. ‘या अमृतमंथन उपासनेद्वारे आमच्या मनाच्या तळाशी लपलेले अनुचित प्रवृत्तिरूपी विष बाहेर पडून शिवकृपेने त्याचा नाश व्हावा आणि शिवकृपेच्या अमृताचा लाभ होऊन आमच्या नवजीवनाची सुरुवात व्हावी’ अशी प्रार्थना प्रत्येक जण ही उपासना करताना करत होता. अमृतमंथन उपासनेवेळी प्रत्येक श्रद्धावान मंथनासाठीचा दोर खेचताना ‘जय शिवशंकर संकटहारी । सागरमंथन विषनिवारी । जय हरिमोहिनी संकटहारी । जीवनमंथन अमृतदायी ॥’ हा गजर करीत होता.
ह्यानंतर सदगुरु श्रीअनिरुद्धांनी अमृतमंथन कथेचा मूलार्थ सांगणारा मंत्र सर्व श्रध्दावानांना समजावून सांगितला. ह्या अमृतमंथन उपासनेची सांगता होमहवनाने झाली. ‘श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी । हे नाथ नारायण वासुदेवा ॥’ हा गजर करत सर्वांनी पवित्र यज्ञाग्नित समिधा अर्पण केल्या आणि रात्री ११ वाजता सर्वजण सत्संगात सहभागी झाले.
तिसरा दिवस म्हणजे दिनांक १९ रोजी सकाळीच सर्व श्रध्दावान पुण्यक्षेत्र श्रीक्षेत्र साखळी येथील दत्तमंदिरात दर्शनासाठी गेले. तेथून आल्यावर दुपारी भोजन व विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळी ४:३० वाजता श्री मंगेश उपासना सुरू झाली. सर्वजण स्टेजजवळ जमले व उपासना करून तेथून महाभोगाचा लाभ घेऊन श्री मंगेशाच्या दर्शनासाठी गेले.
रात्री सर्वांनी मिळून सत्संग केला आणि सत्संगाच्या अखेरीस श्री मंगेश – शांतादुर्गेचा गोंधळ घातला गेला. गोव्यात पूर्वी शांतादुर्गेचा गोंधळ घातला जात असे. हा गोंधळ पाहताना अनेकांना पूर्वी अनुभवलेल्या गोंधळाचे स्मरण झाले.
दिनांक २० मे १९९९ रोजी श्री क्षेत्र मंगेश व शांतादुर्गा – गोवा रसयात्रेचा सांगता समारंभ झाला. सद्गुरुंसह रसयात्रा करून भक्तिरसाच्या चैतन्याने भरलेल्या अन्त:करणाने श्रद्धावान परतीच्या प्रवासाला निघाले.