‘अभिगम्योत्तमं दानम्|’

‘ज्याला गरज आहे त्याच्याकडे जाऊन केलेले दान हे सर्वोत्तम दान.’ – महर्षी पराशर.

‘खरोखरच कित्येक वेळा काही जीव इतके दुर्बळ  व असहाय्य स्थितीत असतात, की त्यांना सहाय्य घेण्यासाठी दात्याकडे जाण्याची शक्तीदेखील उरलेली नसते, एवढेच नव्हे तर दाता समोर आल्यावर त्याच्याकडे मागण्याचीदेखील ताकद उरलेली नसते, अशा वेळेस या जीवांना जे काही द्यायचे ते दात्याने स्वतःहून त्यांच्या स्थळी नेऊन द्यावे. कारण व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील उणीवा दूर करणे हेच दानामागचे पवित्र तत्त्वज्ञान आहे.’ असे श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजच्या प्रथम खंडात सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी सांगितले आहे.

आजही भारतात अशी कुटुंबे आहेत, ज्यांना दिवसभराच्या कष्टानंतरही एक वेळचे पोटभर अन्न मिळत नाही. जे आपली एकवेळची भूकदेखील नीट भागवू शकत नाहीत, अशी कुटुंबे आपल्या मुलांना शाळांमध्येतरी कशी पाठवतील? आणि जरी त्यांनी मुलांना शाळेत पाठवले, तर या मुलांकडून अभ्यास कसा होईल? या मुलांना चांगले आरोग्यही प्राप्त होऊ शकत नाही. यामुळे पिढीचा विकास खंडित होतो. जर या मुलांना उचित पौष्टिक आहार मिळाला तर ही मुले शाळेत येऊन अभ्यासही करतील आणि त्यांच्या प्रगतीची द्वारे खुली होतील. हा विचार करूनच २००७ मध्ये सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनाखाली श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन आणि संलग्न संस्थांनी ’अन्नपूर्णा महाप्रसादम्’ ही योजना सुरू केली.

अन्नपूर्णा महाप्रसादम् म्हणजे काय ?

श्रद्धावान अन्नदान करून आपल्या सदगुरुप्रती प्रेम व्यक्त करतात आणि याच प्रेमाने, श्रद्धेने श्रद्धावान सेवक शाळेत स्वयंपाक करून या विद्यार्थ्यांना जेवायला वाढतात. त्यांच्या या निष्काम सेवा आणि भक्तीभावामुळे हे अन्न म्हणजे प्रसाद बनतो. त्यामुळेच सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनी यास ‘प्रसादम्’ असे म्हटले आहे. अन्नाची पूर्ती आणि सगळ्यांचे पोषण करणार्‍या ‘देवी अन्नपूर्णे’च्या आशीर्वादामुळे हे कार्य संपन्न होते. यामुळे या योजनेला अन्नपूर्णा देवीचा ‘प्रसाद’ म्हणजेच ’अन्नपूर्णा महाप्रसादम्’ असे म्हटले आहे.

अन्नपूर्णा महाप्रसाद‌म्‌ची संकल्पना –

१. ह्या योजनेअंतर्गत श्रद्धावान धान्य, तेल आणि इतर आवश्यक गोष्टींचे दान करू शकतात.

२. दान केलेले सर्व धान्य आणि इतर सामग्री गरजू शाळांसाठी विविध ठिकाणी वितरीत केली जाते.

३. शाळांमध्ये श्रद्धावान सेवक स्वतः जाऊन दुपारचे जेवण शिजवतात आणि विद्यार्थ्यांना पोटभर अन्न खाऊ घालतात.

४. या योजनेमुळे दानासारखे पुण्यकर्म तर होतेच पण बरोबरच श्रमदान सेवेमुळे श्रद्धावानांना आपले वाईट प्रारब्ध नष्ट करण्यासाठी सदगुरुंचा आशीर्वादही प्राप्त होतो.

५. याचबरोबर चांगले शिक्षण प्राप्त करण्यासाठी जी शारीरिक ताकद आवश्यक असते ती या अन्नाद्वारे विद्यार्थ्यांना मिळते ज्यामुळे सक्षम भारत बनण्याच्या दिशेने आपण कूच करू शकतो.

अन्नपूर्णा महाप्रसादम्‌चा उद्देश

शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना समतोल आणि पोषक आहार मिळावा आणि दुपारच्या जेवणाच्या ओढीने तरी पालकांनी त्यांच्या मुलांना दररोज शाळेत पाठवावे याच उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. ज्यामुळे भूक आणि शिक्षण या दोन्ही समस्यांचे निवारण होऊ शकेल.

वाटप आणि व्यवस्थापन

‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’द्वारे धान्य, कडधान्य, तेल, मसाले अशा जिन्नसांचे दान अनिरुद्ध गुरुक्षेत्रम खार (पश्चिम), मुंबई येथे स्वीकारले जाते. तसेच हे दान फाऊंडेशनच्या विविध उपासना केंद्रातही स्विकारले जाते. दर गुरुवारी आपण श्री हरिगुरुग्राम, न्यू इंग्लिश स्कूल वांद्रे (पूर्व) मुंबई येथेही दान करू शकतो.

दान केलेले सर्व धान्य मुंबई नजिकच्या विरार, ठाण्याच्या दुर्गम गावांमध्ये पाठविले जाते. त्या गावांमधील स्थानिक श्रद्धावान सेवक स्वतः दररोज स्वयंपाक करून या विद्यार्थ्यांना ताजे जेवण उपलब्ध करून त्यांना प्रेमाने जेवायला वाढतात. मुलांची जेवणे आटोपल्यानंतर स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून, भांडी घासून श्रद्धावान सेवक आपली त्या दिवसाची सेवा सद्‌गुरु चरणी अर्पण करतात.

सद्य परिस्थिती

अन्नपूर्णा महाप्रसादम योजनेअंतर्गत २० हून अधिक शाळांमध्ये ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ तर्फे सेवा दिली जाते. उदाहरणार्थ विद्या वैभव विद्यालय, केळवे रोड, या शाळेतील २५०-३०० विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. ही मुले आदिवासी कष्टकरी आणि इतर रोजंदारी कामगार वर्गातून आलेली असतात. विरार, सफाळे आणि मायखोप या उपासना केंद्रातील श्रद्धावान या सेवेत प्रेमाने सक्रिय असतात. दररोज या मुलांना दुपारचे जेवण दिले जाते, ज्यामध्ये वरण, भात आणि उसळ असते. यासाठी जी काही आवश्यक कामे असतात, ती सर्व हे श्रद्धावान करतात.

ज्या शाळा दोन सत्रात कार्यरत असतात अशा शाळांसाठी श्रद्धावान ११:३० ते २:०० या वेळेत जेवण तयार करतात. ज्यामुळे दोन्ही सत्रांतील विद्यार्थ्यांना ताजे व गरम जेवण मिळते. आजमितीस श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन व संलग्न संस्थांच्या ७००-८०० श्रद्धावानांनी ह्या सेवांमध्ये सहभाग घेतला. आपल्या व्यस्त दिनक्रमातूनही आपला व्यवसाय किंवा नोकरी सांभाळून हे श्रद्धावान या सेवेसाठी प्रेमाने वेळ देतात.

कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य शिबीर

कोल्हापूरच्या पेंडाखळे या गावात आयोजित केल्या जाणार्‍या शिबीरात दरवर्षी सुमारे १०० विविध शाळांतील ९००० हून अधिक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात. या शिबीरात अन्नपूर्णा महाप्रसादम्‌तर्फे दिल्या जाणार्‍या भोजनाचा आनंद ही मुले लुटतात आणि त्याच बरोबर आपले ताट, वाट्या स्वच्छ धुवूनदेखील ठेवतात. सर्वजण ’वदनी कवळ घेता…’ ही प्रार्थना म्हणूनच भोजनाला सुरुवात करतात. त्यामुळे परमेश्वराचे नामस्मरण करून त्यास धन्यवाद देऊन अन्नग्रहण करण्याचे संस्कारही नकळतपणे या मुलांवर होतात. म्हणूनच अन्नपूर्णा महाप्रसादम् ही योजना केवळ भूक भागविण्याची योजना नसून आपल्या देशाच्या भावी पिढीस मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सक्षम आणि उज्ज्वल बनवणारी महत्त्वपूर्ण योजना आहे.

अन्नपूर्णा महाप्रसादम्‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *