साईनिवास होळी पौर्णिमा उत्सव

फाल्गुन पौर्णिमा अर्थातच होळी पौर्णिमा. देशभरात हा सण पंचमीपर्यंत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सुकी लाकडे, गोवर्‍या एकत्र करून त्याची  ‘होळी’ तयार केली जाते आणि ती पेटविली जाते. त्यानंतर होलिकामातेची पूजा करून स्वतःमधल्या दुर्गुणांचे परिमार्जन होऊ दे, अशी प्रार्थना केली जाते. होळी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी देशभरात ‘धुळवड’ साजरी केली जाते. म्हणून याला ‘रंगाचा उत्सव’ असेही म्हटले जाते.

संपूर्ण देशभर आनंदाने आणि उत्साहाने साजरे होणारे हे होळीपर्व वांद्रे येथील साईनिवासमध्ये उत्साहात साजरे होते. हे साईनिवास म्हणजे साईबाबांवर अढळ श्रद्धा व विश्‍वास असणार्‍या गोविंद रघुनाथ दाभोलकर अर्थात हेमाडपंत यांचे निवासस्थान. याच निवासस्थानात हेमाडपंतांनी श्रीसाईसच्चरित हा ग्रंथ लिहिला. जो प्रत्येक साईभक्तांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. हे साईसच्चरित साईबाबांच्या लीलांचे, संकटात सापडलेल्या आपल्या भक्तांसाठी धावून जाणार्‍या साईनाथांचे चरित्र तर आहेच, त्याचबरोबर साईबाबांवर श्रद्धा व विश्‍वास ठेवणार्‍या, त्यांची कृपाप्राप्त करून घेणार्‍या नानाविध साईभक्तांचे चरित्रही आहे, हे सद्गुरू अनिरुद्धांनी अनेकवेळा सांगितले आहे. हा महान ग्रंथही याच साईनिवासातील वास्तूमध्ये लिहला गेला. याच साईसच्चरित ग्रंथातील ४० व्या अध्यायात साईनिवासमध्ये होळी पोर्णिमा उत्सव कसा व कधी सुरू झाला, याचा स्पष्ट उल्लेख येतो.

श्री साईसच्चरितातील हेमाडपंतांची कथा –

१९१७ साली साईनाथ शिर्डित प्रत्यक्ष देहधारी असताना होळी पौर्णिमेच्या पहाटे हेमाडपंताना एक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष साईबाबा एका संन्याशाच्या रूपामध्ये आले आणि स्वप्नातच हेमाडपंतांना सांगू लागले की, “आज मी तुझ्याकडे भोजनाला येणार आहे”. एवढे बोलणे झाल्यावर हेमाडपंतांचे स्वप्न तुटले. परंतू त्यांना जागृतावस्थेतही स्वप्नातला प्रत्येक शब्द जसाचा तसा आठवत होता.

हेमाडपंतांचा बाबांशी सात वर्षाचा घनिष्ठ संबंध होता. बाबांच्या शब्दांवर त्यांचा पूर्ण विश्‍वास होता. बाबांनी सांगितले म्हणजे ते येणारच, किंबहूना भोजनाच्या वेळेस जे येतील त्यांना मी साईंसमानच मानेन असे त्यांनी ठरवले होते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या पत्नीला आणखी एक पाहुणा भोजनाला येणार असल्याचे सांगून जास्त स्वयंपाक बनवायला सांगितले.

हेमाडपंत बाबांची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. दुपारच्या भोजनाची वेळ झाली. सर्व तयारी झाली. पत्रावळ्यांवर भोजनही वाढण्यात आले. हेमाडपंत बाबांची वाट पाहत दरवाजाकडेच नजर ठेवून होते. इतक्यात जिन्यांवरून पावलांचा आवाज आला. ‘अल्लीमहमद’ आणि ‘इस्मू मुजावर’ हे दोघेजण आले. त्यांच्या हातात श्री साईंची तसबीर होती. साईंची ती तसबीर पाहून हेमाडपंताच्या शरीरावर रोमांच उठले. साईंच्या लीलेने ते सद्गदित झाले. त्यानंतर दरवर्षी होळी पौर्णिमेला साईनिवासमध्ये प्रतिमा स्वरूपातील श्रीसाईनाथांच्या आगमनाप्रीत्यर्थ होळी उत्सव साजरा केला जातो.

होळी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्रद्धावान भक्तांसाठी श्री साईंच्या त्या मूळ तसबिरीला नमस्कार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे सदगुरु श्री अनिरुद्धांनी सांगितले आहे.

१९९७ पासून सदगुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार ह्या उत्सवानिमित्ताने अनेक भक्तिमय उपक्रम साईनिवास येथे सुरू केले गेले.

१) प्रतिवर्षी होळी पौर्णिमेच्या दोन दिवस आधी श्रीसाईसच्चरिताच्या पारायणाने उत्सवाची सुरुवात होते.

२) पारायणाच्या समाप्तीनंतर खाली दिलेल्या गजराच्या घोषात साई-निवासच्या भोवती दिंडी काढली जाते

गजर – ’दीक्षित, शामा, हेमाड, बायजाबाई, नाना, गणू, मेघा श्याम । ह्यांची वाट पुसता पुसता मिळेल आम्हा साईराम ॥’

३) ॐ साईराम असे लिहिलेला ध्वज प्रत्येक होळी पौर्णिमेला बदलला जातो व नवीन ध्वजाची पूजा केली जाते.

४) साईनाथांची मूळ तसबीरीचे विधिवत पूजन केले जाते

५) होलिकामातेचं  पूजन केलं जातं. होळी पेटविल्यानंतर ’ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथाय नम:’ ह्या जपाचे पठण होते. होलिकामातेला पाच प्रकारची धान्यं अर्पण केली जातात आणि त्यानंतर आरती केली जाते.

६) उत्सवाच्या दिवशी ’ॐ साई शिवाय । ॐ साई रामाय । ॐ साई कृष्णाय नम: ।’ ह्या जपाचे अखंड पठण सर्व दाभोलकर कुटुंबीय सुरू करतात व एकमेकांना बुक्का लावतात. त्यानंतर दर्शनाला आलेले श्रद्धावानही या जप म्हणत एकमेकांना बुक्का लावतात. हा जप दिवसभर सर्वांच्या मुखात असतो. अनेक वर्ष हा जप स्वतः सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध दाभोळकर कुटुंबियांना बुक्का लावून सुरू करून देत असत.

८) साईनिवासमध्ये १९९८ साली होळी पौर्णिमेच्या दिवशी तेलाचा अखंड दीप प्रज्वलित केला गेला. व याच दीपातून निघालेल्या दीपशिखेच्या आगमनाने श्रीहरिगुरुग्राम येथे रामनवमी उत्सवाचा प्रारंभ होतो. तसेच या दिपशिखेच्या सहाय्याने श्रीसाईराम सहस्त्रयज्ञाचे प्रज्वलन करण्यात येते.

९) साईनिवास इमारतीच्या मागील बाजूस तुळशी वृंदावन व चौथरा बांधलेला आहे. तेथे सर्व श्रद्धावान सुदीप लावू शकतात.

१०) सर्व श्रद्धावान होळीची पुरणपोळी प्रसादासाठी अर्पण करतात.

होळी पौर्णिमा २०१७ शताब्दी महोत्सव –

११ मार्च २०१७ रोजी होळी पौर्णिमा उत्सवाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साईनिवासमध्ये एक सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अ) ह्या पूजेच्या दिवशी सदगुरु श्री अनिरुद्धांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ ते रात्रौ १० वा. पर्यंत ’ॐ कृपासिंधु श्री साईनाथाय नम:’ या जपाचे एक लाख आठवेळा (१,००,००८) पठण करण्यात आले.

ब) ह्या जपाच्या पठणाच्या वेळी श्री. आप्पासाहेब दाभोलकर व त्यांचे कुटुंबीय त्या मूळ, पवित्र साई तसबिरीवर तुळशीपत्रं व बेलपत्रं अर्पण करत होते. सर्व श्रद्धावानांना पठणामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

क) श्रीसाईसच्चरित ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात ९ मार्च २०१७ ला झाली. पहिल्या दिवशी श्रद्वावानांनी १ ते २६ अध्यायाचे पठण केले. दुसर्‍या दिवशी  १० मार्च २०१७ ला २७ ते ५२ अध्यायांचे वाचन झाले. ११ मार्च ला साईसच्चरिताच्या शेवटच्या ५३ व्या अध्यायाचे वाचन पूर्ण होऊन समाप्तीचा सोहळा पार पडला.

ड्) ह्या शताब्दी महोत्सवानिमित्त १२ फेब्रुवारी २०१७ रोजी श्रीपंचमुख हनुमंत्‌कवचाचे १०८ वेळा पठण आयोजित करण्यात आले. १९ फेब्रुवारी २०१७ रोजी श्री शिवपंचाक्षर स्तोत्राचे १०८ वेळा पठण करण्यात आले.

परमेश्‍वराची तसबीर ही फक्त फोटो किंवा प्रतिमा नसते, तर साक्षात त्याचे अस्तित्व त्या स्थानी असते. म्हणूनच या पवित्र दिवशी श्रद्धावानाने श्री साईनाथांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन त्यासमोर नतमस्तक होणे श्रेयस्कर असते.

ज्या वास्तूला सद्‌गुरुंच्या दोन रूपांचा अनुभव लाभला आहे अशा वास्तूमध्ये सद्‌गुरु नवरात्र साजरी करता येते असे मानले जाते. ही नवरात्र अश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून दसर्‍यापर्यत साजरी केली जाते. साईनिवासमध्ये सद्‍गुरु नवरात्र सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार १९९७ सालापासून साजरी करण्यात येत आहे.

Leave a Reply