मायेची ऊब

आई किंवा आजीच्या साडीची प्रेमाने शिवलेली ‘गोधडी’ ही सर्वसाधारण गोधडी नसते, तर अशा गोधडीतून मिळणारी ऊब ही ‘मायेची ऊब’ असते. मात्र देशात अनेक कष्टकरी कुटुंबांना अशी मायेची ऊब देणारी गोधडी मिळणे दुरापास्त असते. हिवाळ्यातील बोचर्‍या थंडीत अंगावर पांघरण्यासाठी काहीही उपलब्ध नसलेल्यांना हे दिवस कुडकुडत काढावे लागतात. म्हणूनच सद्‌गुरु श्रीअनिरुद्धांनी ‘मायेची ऊब’ हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाअंतर्गत जुन्या साड्यांपासून श्रद्धावान गोधड्या शिवतात व या गोधड्यांचे नंतर गरजूंना वाटप केले जाते.

यासाठी श्रद्धावान पुरुष व स्त्रिया दोघांनाही गोधड्या शिवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. जुन्या साड्या, चादरी यांपासून गोधडी तयार करायला शिकवले जाते. गोधडी शिवताना घालण्यात येणारे टाके मुद्दामहून अतिशय छोटे घातले जातात. यामुळे लहान बाळांच्या कानातली रिंग किंवा पायातले वाळे त्यात अडकत नाहीत. तसेच या गोधड्या वजनाने हलक्या बनविल्या जातात. त्यामुळे गरोदर स्त्रियांनाही या गोधड्या धुवून वाळत घालता येतात. तसेच गोधड्यांच्या चारही बाजू पद्धतशीरपणे बंद केल्या जातात. यामुळे खेड्यापाड्यात गोधडीच्या आतील (पदराच्या) भागात कीटक, गांडूळ किंवा सापाचे पिल्लू शिरू शकत नाही.

गोधडीचे वैशिष्ट्य –

बाजारात विकत घेतलेल्या गोधड्या आणि श्रध्दावानांनी स्वतःच्या हाताने बनविलेल्या या गोधड्या यांमधील महत्वाचा फरक म्हणजे या कुठल्याही अपेक्षेशिवाय व सद्‍गुरुंवरील निरपेक्ष प्रेमापोटी बनविलेल्या असतात. श्रद्धावान परमेश्‍वराचे व सद्‍गुरुंचे नामस्मरण करीत या गोधड्या बनवतात, त्यामुळे या सेवेला भक्तीची जोडही मिळते तसेच गोधडी तयार करण्याचेही समाधान मिळते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम्’ मध्ये अनसूयामाता आणि महिषासुरमर्दिनीला अर्पण केलेले ब्लाऊजपीस आणि दत्तगुरुंना अर्पण केलेले उपरणेही गोधडी तयार करताना वापरली जातात. यामुळे अनसूयामाता, मोठी आई जगदंबा आणि दत्तगुरुंचा आशीर्वादही गोधडी बनवणार्‍या श्रद्धावानाला व वापरणार्‍या गरजवंताला अशा उभयतांनाही मिळतो असा श्रद्धावानांचा विश्वास आहे.

गोधड्या वाटप –

दरवर्षी कोल्हापूर आणि विरार येथील मेडिकल कॅम्पमध्ये गरजूंना गोधड्या दिल्या जातात. २६ जुलै २००५ च्या मुंबई पुरादरम्यान अनेक गरजू कुटुंबांना गोधड्या देण्यात आल्या होत्या. २००२ सालापासून (२०१८ पर्यंत) धुळे, कोल्हापूर, रत्नागिरी व नवी मुंबई इथे सुमारे ८४,००० गोधड्या बनवून त्या गरजूंना वाटण्यात आल्या. सद्गुरु श्रीअनिरुद्धांचा वाढदिवस किंवा इतर विशेष धार्मिक कार्याच्या निमित्ताने श्रध्दावान गोधडी शिवून त्या भेट किंवा दान स्वरूपात देतात.

 

Leave a Reply